सिल्हेट : भारतीय महिला संघाचे तब्बल सातव्यांदा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याचे लक्ष्य असून शनिवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात त्यांच्यापुढे श्रीलंकेचे आव्हान असेल.

भारतीय संघाने यंदाच्या आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेत वर्चस्वपूर्ण कामगिरी केली आहे. भारताने सहापैकी पाच साखळी सामने जिंकताना दिमाखात उपांत्य फेरी गाठली. या फेरीत भारताने तुलनेने दुबळय़ा थायलंडला सहज पराभूत करत विक्रमी आठव्यांदा आशिया चषकाची अंतिम फेरी गाठली. आता श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यातही हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारताचे पारडे जड मानले जाते आहे.

यंदाच्या आशिया चषकात कर्णधार हरमनप्रीतला दुखापतीमुळे तीन सामन्यांना मुकावे लागले. तसेच उपकर्णधार स्मृती मानधनालाही फारशी चमक दाखवता आलेली नाही. मात्र युवा खेळाडूंनी पुढाकार घेत भारतीय संघाच्या अंतिम फेरीपर्यंतचा मार्ग सुकर केला. १८ वर्षीय सलामीवीर शफाली वर्मा (१६१ धावा व तीन बळी), २२ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्ज (२१५ धावा) आणि २५ वर्षीय दीप्ती शर्मा (९४ धावा व १३ बळी) यांनी भारताच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

भारतीय संघाला यंदाच्या स्पर्धेत केवळ पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत आणि प्रशिक्षक रमेश पोवार यांनी घेतलेल्या काही निर्णयांवर बरीच टीका झाली. परंतु भारताला या पराभवाची परतफेड करण्याची यंदा संधी मिळणार नाही. पाकिस्तानच्या संघाला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. उपांत्य फेरीत श्रीलंकेने पाकिस्तानवर मात केली. मात्र श्रीलंकेला नमवण्यासाठीही भारताला आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल.

श्रीलंकेच्या संघाची मदार कर्णधार चमारी अटापट्टूवर असेल. तसेच फलंदाजीत हर्षिता मदावी (२०१ धावा) आणि गोलंदाजीत इनोका रणवीरा (१२ बळी) यांनी चमक दाखवली आहे.   

’ वेळ : दु. १ वा. ’

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २