ऑस्ट्रेलिया-इंग्लंड आमनेसामने
महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी. एकमेकांविरुद्ध विजयासाठी शेवटच्या क्षणापर्यंत जिवाचे रान करणारे हे दोन संघ महिला क्रिकेट विश्वचषकात सुपर सिक्स गटाच्या पहिल्या लढतीत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. तीन वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या इंग्लंडला या स्पर्धेत पहिल्या सामन्यात श्रीलंकेने पराभवाचा धक्का दिला. मात्र त्यानंतर भारत आणि वेस्ट इंडिजला नमवत इंग्लंडचा संघ विजयपथावर परतला. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने साखळी गटातल्या तिन्ही लढती जिंकल्या आहेत. इंग्लंडचे गोलंदाज फॉर्मात आहेत, मात्र फलंदाजांना आपली कामगिरी सुधारावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या लिसा स्थळेकरला लौकिलाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
न्यूझीलंडसमोर श्रीलंकेचे आव्हान
मुंबई : गतविजेत्या इंग्लंडला पराभवाचा धक्का देणाऱ्या तसेच यजमान भारताचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आणणाऱ्या श्रीलंकेची सुपर सिक्स गटाची पहिली लढत न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. जबरदस्त सांघिक प्रदर्शनाच्या जोरावर विजय मिळवणाऱ्या श्रीलंकेला रोखणे हे न्यूझीलंडपुढील आव्हान आहे. कौशल्या लोकूसुरिया आणि दीपिका रसंगिका चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. कर्णधार शशिकला सिरीवर्धनेकडून श्रीलंकेला अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा आहे. न्यूझीलंडकरता कर्णधार सुजी बेट्सचा फॉर्म ही जमेची बाजू आहे. सियान रक आणि रचेल कँन्डी ही गोलंदाजांची जोडी न्यूझीलंडसाठी महत्त्वपूर्ण आहे.
दक्षिण आफ्रिका – वेस्ट इंडिज समोरासमोर
कटक : प्राथमिक फेरीअखेर गटात शेवटचे स्थान राखणारे दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज आमनेसामने असणार आहेत. साखळी गटात दोन्ही संघांना एकमेव विजय मिळवता आला होता. मॅरिझ्ॉन कॅपच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर आफ्रिकेने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. स्टीफनी टेलरच्या १७४ धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजने श्रीलंकेचा धुव्वा उडवला होता. मॅरिझन कॅपचा अष्टपैलू खेळ हे दक्षिण आफ्रिकेचे बलस्थान आहे. डेंड्रा डॉटिन आणि स्टीफनी टेलर या फलंदाजांकडून वेस्ट इंडिजला मोठय़ा अपेक्षा आहेत. गोलंदाजीत अनिसा मोहम्मदची फिरकी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकते.