Women’s T20 World Cup 2020 Ind vs Eng : टी २० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा उपांत्य फेरीचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. पावसामुळे एकही चेंडूचा सामना होऊ शकला नाही. त्यामुळे गुणांच्या तुलनेनुसार भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान मिळाले. साखळी फेरीत भारताने ४ सामने जिंकत ८ गुण मिळवले होते. तर इंग्लंडने ३ सामने जिंकून ६ गुण मिळवले होते. त्यामुळे स्पर्धेच्या नियमांच्या आधारावर भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान देण्यात आले. महिला टी २० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारताने प्रथमच अंतिम फेरीत धडक मारली आहे.

भारताने साखळी फेरीत आपले सर्व सामने जिंकले आणि उपांत्य फेरी गाठणाऱ्या पहिल्या संघाचा मान पटकावला. इंग्लंडला साखळी फेरीत एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पण इतर सामन्यांत केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने उपांत्य फेरीत धडक मारली. यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघ अजिंक्य आहे, पण इंग्लंडने २००९, २०१२, २०१४ आणि २०१६ तसेच २०१८च्या विश्वचषकात भारताला हरवले होते. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरतो? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. पण अखेर पावसामुळे सामना होऊ शकला नाही आणि इंग्लंडच्या संघाचे आव्हान संपुष्टात आले.

आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये उपांत्य फेरीचा दुसरा सामना रंगणार आहे. त्या सामन्यातही पावसाचा व्यत्यय आला आणि सामना होऊ शकला नाही, तर गुण आणि धावगतीच्या आधारावर आफ्रिकेच्या संघाला अंतिम फेरीचे तिकीट देण्यात येईल.

Live Blog

10:47 (IST)05 Mar 2020
पावसामुळे सामना रद्द, भारत प्रथमच अंतिम फेरीत

टी २० विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार होता, पण पावसामुळे एकही चेंडूचा सामना होऊ शकला नाही. त्यामुळे भारताने महिला टी २० च्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत धडक मारली.

09:29 (IST)05 Mar 2020
सामन्यात पावसाची बॅटिंग; टीम इंडियाचं काय होणार?

सध्या सुरू असलेल्या पावसामुळे भारत आणि इंग्लंड दोनही संघ तंबूत बसून आहेत. मात्र या पावसाचा भारताला काहीही फटका बसणार नाही. जर पाऊस थांबलाच नाही आणि सामना सुरू झाला नाही, तर गुणांच्या तुलनेनुसार भारतीय संघाला थेट अंतिम फेरीचे तिकीट मिळणार आहे. कारण भारताचे साखळी फेरीत ८ गुण होते, तर इंग्लंडचे केवळ ६ गुण होते.

09:19 (IST)05 Mar 2020
पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्याला उशीर

भारत-इंग्लंड उपांत्य फेरीच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने सामना सुरू होण्यास उशीर होत आहे. किमान १०-१० षटकांचा सामना खेळण्यासाठी भारतीय वेळेनुसार ११.१५ च्या सुमारास नाणेफेक होण्याची शक्यता आहे. जर नाणेफेक झाली तर उशिरात उशिरा सामना ११.३० च्या सुमारास सुरू होऊ शकतो.