Dhruv Jurel Salute His Father : आयपीएल २०२४ च्या ४४ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सचा सात गडी राखून पराभव केला. इकाना स्टेडियमववर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात संघाने संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली या हंगामामधील आठवा विजय संपादन केला. एलएसजीविरुद्धच्या विजयात भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलचे महत्त्वाचे योगदान होते. त्याने सामना जिंकण्यासाठी कर्णधार संजू सॅमसनबरोबर १२१ धावांची भागीदारी केली होती. जुरेलने ३४ चेंडूंत ५२ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली.
आयपीएल २०२४ मध्ये ध्रुव जुरेलची बॅट आतापर्यंत शांत होती; मात्र लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात तो फॉर्ममध्ये आला आणि त्याने या मोसमामधील पहिले अर्थशतक झळकवले. ५० धावा केल्यानंतर त्याने पुन्हा एकदा खास पद्धतीने सेलिब्रेशन केले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ध्रुव जुरेलची सैनिक वडिलांना सलामी
लखनौच्या इकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात आग्र्याच्या ध्रुव जुरेलने आपल्या शानदार खेळीने चाहत्यांची मने जिंकली. अर्धशतक झळकवल्यानंतर त्याने आपल्या सैनिक वडिलांना खास सलामी दिली. भरमैदानात हजारो प्रेक्षकांसमोर वडिलांना सलामी देत केलेल्या त्याच्या सेलिब्रेशनची आता खूप चर्चा रंगतेय. सामना संपल्यानंतर जुरेलने या सेलिब्रेशनमागचे कारण सांगितले.
“माझा सलाम फक्त त्यांच्यासाठी”
धुव्र जुरेल म्हणाला की, मी नेहमी माझ्या वडिलांसाठी खेळतो. ते सैन्यात आहेत आणि ते आज स्टेडियममध्ये उपस्थित होते. ५० धावा केल्यानंतर माझा सलाम फक्त त्यांच्यासाठी होता.
आरआर वर्सेस एलएसजीविरुद्धच्या सामन्यात नेमके काय झाले?
लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करीत स्कोअरबोर्डवर १९६ धावांची नोंद केली, एलएसीकडून कर्णधार केएल राहुलने ७६ आणि दीपक हुडाने ५० धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात चांगली झाली नाही. केवळ ७८ धावांत यशस्वी जैस्वाल, जोस बटलर व रायन पराग यांच्या विकेट पडल्या. यावेळी कर्णधार संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांनी एकही संधी न देता, १२१ धावांची शानदार भागीदारी करीत राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून दिला. या विजयानंतर आरआर प्लेऑफसाठी जवळपास पात्र ठरले आहेत.