महिला वनडे विश्वचषक २०२५ चे सामने भारतामध्ये खेळवले जात आहेत. यादरम्यान भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरले आहेत. यादरम्यान सेमीफायनलसाठी कोणते संघ एकमेकांविरूद्ध खेळणार या दृष्टीने महत्त्वाचे सामने होतील यादरम्यान इंदूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाच्या दोन महिला खेळाडूंबरोबर छेडछाड केल्याचं प्रकरण समोर आलं आहे.
महिला विश्वचषक २०२५ दरम्यान मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक मोठी घटना समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना शनिवारी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणार आहे. त्याआधी, दोन ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा रस्त्यावर एका दुचाकीस्वाराने विनयभंग केल्याचं वृत्त समोर आलं आहे.
पोलिसांनी या प्रकरणात इंदूरच्या आझाद नगर येथील रहिवासी अकीलला दोषी घोषित केलं आहे आणि त्याला अटक देखील केली आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघ रॅडिसन हॉटेलमध्ये थांबला होता. जवळच एक कॅफे आहे जिथे दोन्ही खेळाडू फिरण्यासाठी गेल्या होत्या. पण त्याच दरम्यान, बाईकस्वार अकील दोन्ही क्रिकेटपटूंना चिडवू लागतो. रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने त्याच्या दुचाकीची नंबर प्लेट पाहिली आणि कारमधील एका प्रवाशाने पोलिसांना कळवलं.
ऑस्ट्रेलियन महिला संघाचे सुरक्षा व्यवस्थापक डॅनी सिमन्स यांनी गुरुवारी संध्याकाळी एमआयजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अकीलला अटक केली. रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तक्रारीची चौकशी करण्यात आली आणि आरोपी विनयभंग आणि पाठलाग केल्याबद्दल दोषी आढळला.
ऑस्ट्रेलिया महिला संघ सध्या स्पर्धेत गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे आणि त्यांचा शेवटचा साखळी सामना शनिवारी इंदूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. या सामन्यानंतर भारताविरुद्ध ऑस्ट्रेलिया की इंग्लंडविरूद्ध उपांत्य सामना खेळणार, हे निश्चित होईल. जर ऑस्ट्रेलिया जिंकला तर त्यांचा सामना २९ ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथे होणाऱ्या उपांत्य सामन्यात भारताशी होईल. जर संघाने सामना गमावला तर ३० ऑक्टोबर रोजी उपांत्य फेरीत त्यांचा सामना इंग्लंडशी होईल.
