, एकातेरिनबर्ग (रशिया)

राष्ट्रीय विजेत्या दुर्योधन सिंग नेगी याने अर्मेनियाच्या कोरयून अ‍ॅस्टोयान याचा ४-१ असा धुव्वा उडवत जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत आगेकूच केली आहे.

दुर्योधनपेक्षा अ‍ॅस्टोयान अधिक प्रभावी वाटत होता, पण त्याने मारलेले ठोसे दुर्योधनपर्यंत ताकदीने पोहोचत नव्हते. अ‍ॅस्टोयानच्या दुबळ्या बचावाचा फायदा उठवत दुर्योधनने त्याच्यावर वर्चस्व गाजवले. अ‍ॅस्टोयानने दुर्योधनला थकवण्याचा प्रयत्न केला, तोही फोल ठरला. अखेरच्या तीन मिनिटांच्या फेरीत दुर्योधनने अ‍ॅस्टोयानला पूर्णपणे नामोहरम केले. पाचपैकी एका पंचाने लढत सुरू असतानाच दुर्योधनच्या बाजूने निकाल दिला. आता दुसऱ्या फेरीत दुर्योधनला जॉर्डनच्या सहाव्या मानांकित झेयाद इशाश याचा सामना करावा लागेल.

राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता मनीष कौशिक (६३ किलो) आणि ब्रिजेश यादव (८१ किलो) यांनीही आपापल्या लढती जिंकून दुसरी फेरी गाठली आहे. आशियाई विजेता अमित पांघल (५२ किलो), आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेता कविंदर सिंह बिश्त (५७ किलो) आणि आशीष कुमार (७५ किलो) यांना पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली आहे.

जागतिक स्पर्धेद्वारे ऑलिम्पिकसाठी थेट पात्र होण्याची संधी खेळाडूंना मिळणार आहे. त्यामुळेच ही स्पर्धा पूर्वीच्या १० गटांऐवजी ८ गटांमध्ये खेळविण्यात येणार आहे. ५२ किलो, ५७ किलो, ६३ किलो, ६९ किलो, ७५ किलो, ८१ किलो, ९१ किलो आणि ९१ किलोवरील गटात ही स्पर्धा खेळविण्यात येत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघामधील (एआयबीए) प्रशासकीय गोंधळामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) पात्रतेचा हा दर्जा काढून घेतला आहे. ऑलिम्पिक पात्रतेच्या प्रक्रियेवर यापुढे पूर्णपणे ‘आयओसी’चे नियंत्रण राहणार आहे. ऑलिम्पिक पात्रतेच्या बॉक्सिंग स्पर्धाना पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या आशियाई स्पर्धेद्वारे सुरुवात होणार आहे.