गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स अर्थात WCL मधील भारत-पाकिस्तान सामना अखेर रद्द झाला आहे. कारण भारतीय संघानं या सामन्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भारत व पाकिस्तानदरम्यान राजकीय पातळीवर निर्माण झालेलं तणावपूर्ण वातावरण, पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर, पाकिस्तानची शरणागती आणि त्यानंतरच्या घडामोडींमुळे दहशतवाद आणि खेळ एकत्र घडू शकत नाही, अशी भूमिका भारतीयांकडून मांडली जात होती. WCL मध्ये खेळणाऱ्या टीम इंडियानंही अशीच भावना व्यक्त करत पाकिस्तानशी खेळण्यास नकार दिला आहे.

नेमकी काय आहे भूमिका?

WCL तर्फे यासंदर्भात भूमिका स्पष्ट करणारी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे. “खूप जड अंत:करणाने इंडिया चॅम्पियन्सनं पाकिस्तानविरुद्धच्या सेमी-फायनल सामन्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणं आमच्यासाठी सोपं नव्हतं. आम्ही क्रिकेट जगतो. आमच्या खेळाडूंना आजतागायत आपल्या देशाबद्दल फक्त गर्व वाटत आला आहे. पण तरीही खेळाडूंना या सामन्यासंदर्भात भावनिक दडपणाचा सामना करावा लागला आहे. आम्ही आमच्या खेळाडूंच्या पाठिशी उभे आहोत. त्यांना कोणतीही भीती वा आरोपांशिवाय खेळता येण्याचा अधिकार आहे”, असं यापोस्टमध्ये WCL नं म्हटलं आहे.

“आम्ही कदाचित या सामन्यातून बाहेर पडू, पण आमच्या तत्वांपासून कधीच लांब जाणार नाही. खेळाच्याही वर देश आहे. दुसऱ्या कशाहीपेक्षा एकता महत्त्वाची आहे. जय हिंद. जय भारत”, असंही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

भारताचा खेळण्यास नकार, पुढे काय?

दरम्यान, भारतीय संघानं पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळे WCL च्या सेमीफायनलचा हा सामनाच रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एकेक गुण मिळाला. त्यामुळे दोन्ही संघांचे पाच सामन्यांमध्ये ४ विजय आणि ९ गुण झाले आहेत. मात्र, गुणतालिकेत भारताच्या वर स्थान असल्यामुळे आता पाकिस्तानचा संघ थेट अंतिम सामन्यात पोहोचला आहे. त्यामुळे पाकिस्तानशी खेळण्यास नकार दिल्यामुळे भारतीय संघ थेट स्पर्धेतूनच बाहेर पडला आहे. आता ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या सेमी फायनलमधील विजेत्याशी पाकिस्तानची अंतिम फेरीत गाठ पडणार आहे.

WCL व्यवस्थापनाची भूमिका

एकीकडे भारतानं आपली भूमिका स्पष्ट केली असताना दुसरीकडे WCL व्यवस्थापनानंदेखील ‘एक्स’वर भूमिका मांडली आहे. “जगात सकारात्मक बदल घडवून आणण्याची ताकद खेळात असते, यावर आमचा विश्वास आहे. पण जनभावनेचा आपण कायम आदर करायला हवा. कारण आपण जे काही करतो, ते सगळं आपल्या प्रेक्षकांसाठीच करतो. सेमी फायनलमधून बाहेर पडण्याच्या इंडिया चॅम्पियन्सच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. पण त्याचवेळी स्पर्धेत खेळत राहण्याच्या पाकिस्तान चॅम्पियन्सच्या निर्णयाचाही आम्ही तितकाच आदर करतो”, असं WCL नं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“यासंदर्भातले सर्व मुद्दे विचारात घेता भारत व पाकिस्तान यांच्यातील सेमीफायनला सामना रद्द झाल्याचं आम्ही जाहीर करतो. परिणामी पाकिस्तान चॅम्पियन्स संघ अंतिम फेरीत दाखल झाल्याचंही निश्चित झालं आहे”, असंही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.