अवघ्या ३४ चालींमध्ये मॅग्नस कार्लसनवर कुरघोडी
दुसऱ्या डावात निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर विश्वविजेतेपदाच्या लढतीत विश्वनाथन आनंदचा पराभव निश्चित, अशी चर्चा सुरू होती. पण पाच वेळा जगज्जेतेपद पटकावणाऱ्या आनंदने तिसऱ्या डावात जोमाने पुनरागमन करत नॉर्वेच्या विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनवर अवघ्या ३४ चालींमध्ये सनसनाटी विजय मिळवत जोमाने पुनरागमन केले. या विजयासह आनंदने जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या १२ फेऱ्यांच्या लढतीत १.५-१.५ अशी बरोबरी साधली.
कार्लसनने दुसऱ्या डावात सनसनाटी विजय मिळवला होता. पहिल्या डावातही विजयाची अंधूक संधी असतानाही आनंदने बरोबरीवर समाधान मानले होते. दुसऱ्या डावात आनंदने निराशाजनक खेळ केला. विशेषत: डावाच्या शेवटच्या टप्प्यात त्याने खूप चुका केल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर आनंदने तिसऱ्या डावात अतिशय उच्च दर्जाचा खेळ केला. दुसऱ्या डावातील पराभवानंतर आनंद व त्याच्या सहकारी स्टाफने खूपच गृहपाठ केला आहे, याचाच प्रत्यय तिसऱ्या डावात दिसून आला.
आनंदला पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळण्याचा फायदा तिसऱ्या डावात मिळणार होता. त्याने वजिरापुढील प्याद्याने सुरुवात केली. कार्लसनने पाचव्या चालीला कॅसलिंग केले. आनंदला एका दृष्टीने त्याचा फायदाच झाला. त्याने आपल्या डाव्या बाजूने जोरदार आक्रमक व्यूहरचना आखत डावाच्या मध्यात घोडा व उंट यांचा खुबीने उपयोग केला. आनंदने वजिरापुढील प्यादे थेट सातव्या घरापर्यंत नेले. या प्याद्याला उंट व हत्तीचे पाठबळ देत त्याने कार्लसनवर दडपण ठेवले. २५व्या चालीस त्याने कॅसलिंग करत राजा सुरक्षित केला पण त्याचबरोबर आनंदने हत्तीचा पाठिंबा आणत आक्रमण अधिक धारदार केले. कार्लसनने आनंदचे आक्रमण रोखण्यासाठी हत्तीचा बळी देत उंट मिळविला. तथापि आनंदने आपले दुसरे प्यादे पुढे नेत त्याच्यावर दडपण आणले. यानंतर वजिरा-वजिरी झाली तर त्यामध्ये आपले खूप नुकसान होणार आहे, असे लक्षात येताच कार्लसनने ३४व्या चालीनंतर पराभव मान्य केला.
तिसऱ्या डावात अतिशय कल्पक चाली करत आपण अजूनही विश्वविजेतेपदाला साजेसा खेळ करू शकतो, हे आनंदने दाखवून दिले आहे. या डावातील त्याचे डावपेच लक्षात घेता, आनंदने कार्लसनच्या विविध डावपेचांचा बारकाईने अभ्यास केला आहे, हे पुन्हा सिद्ध झाले. या डावातील विजयामुळे आनंदचा आत्मविश्वास उंचावला आहे. चौथ्या डावात आनंदला काळ्या मोहऱ्यांनी खेळावयाचे आहे. त्यामुळे तिसऱ्या डावातील विजयाचा तो कसा फायदा घेतो, याचीच उत्सुकता आहे.

dav