विश्वचषकासाठीची तीन स्टेडियम्स अजूनही अपूर्णावस्थेत

आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फिफा) सचिव जेरोम वाल्के यांनी फिफा विश्वचषकासाठीच्या १२ स्टेडियम्सपैकी तीन स्टेडियम्सच्या नूतनीकरणाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फिफा) सचिव जेरोम वाल्के यांनी फिफा विश्वचषकासाठीच्या १२ स्टेडियम्सपैकी तीन स्टेडियम्सच्या नूतनीकरणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. अजूनही तीन स्टेडियम्सचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. यजमान शहरांच्या स्टेडियम्सची पाहणी केल्यानंतर वाल्के यांनी ही चिंता व्यक्त केली आहे.
नताल, पोटरे अलेग्रे आणि साव पावलो या तीन स्टेडियम्सचे बांधकाम अपूर्णावस्थेत असल्यामुळे वाल्के यांनी संयोजकांना इशारा दिला आहे. साव पावलो स्टेडियमवर पहिले दोन सामने खेळवण्यात येणार आहेत. ‘‘नतालमध्ये संयोजकांची घडय़ाळाशी शर्यत लागली आहे. पोटरे अलेग्रेमध्येही अद्याप बरेच काम व्हायचे बाकी आहे. साव पावलो स्टेडियमही अद्याप पूर्णपणे सज्ज नाही. त्यामुळे १२ जूनला ब्राझील वि. क्रोएशिया या सलामीच्या सामन्यासाठी पूर्ण स्टेडियम सज्ज होईल का, याबाबत साशंकता आहे,’’ असे वाल्के यांनी सांगितले.
स्टेडियम्समध्ये तात्पुरती बैठक व्यवस्था करण्यात आल्यामुळे स्थानिक संयोजकांनी तिकिटे वितरित करण्याची परवानगी दिलेली नाही. वाल्के म्हणाले, ‘‘अन्य नऊ स्टेडियम्सचे बांधकाम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. वेळेआधी सर्व स्टेडियम्स सज्ज होतील, हा संयोजकांचा दावा पूर्ण करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. १३ जूनला सॅल्वेडॉरमध्ये स्पेन आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना म्हणजे गेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीची पुनर्लढत होणार आहे. या सामन्यासाठी हे स्टेडियम सज्ज आहे.’’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: World cup 2014 fifa concern about three brazil stadiums