भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा आपल्या संथ फलंदाजीमुळे टीकेचा धनी झाला आहे. बांगलादेशविरोधातील सामन्यातही महेंद्रसिंग धोनीने संथ फलंदाजी करत ३३ चेंडूत फक्त ३५ धावा केल्या. एकीकडे धोनीवर टीका होत असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मात्र समर्थन केलं आहे. भारतीय संघासाठी धोनीची खेळी अत्यंत महत्त्वाची होतं असं सचिनने म्हटलं आहे.

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत बांगलादेशसमोर ३१५ धावांचं आव्हान उभं केलं होतं. हा सामना जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश करणारा भारत हा ऑस्ट्रेलियानंतर दुसऱा संघ ठरला आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला असला तरी धोनीवर मात्र त्याच्या संथ खेळीमुळे टीका होत आहे. यावरुन इंग्लंड संघाचा माजी कर्णधार नासीर हुसेन आणि सौरभ गांगुलीनेही टीका केली होती.

महत्त्वाचं म्हणजे अफगाणिस्तानसोबत झालेल्या सामन्यानंतर सचिन तेंडुलकरने धोनीच्या स्ट्राइक रेटवरुन नाराजी व्यक्त केली होती. ‘मी थोडा नाराज आहे. अजून चांगली खेळी करता आली असती. केदार जाधव आणि धोनीमध्ये झालेल्या पार्टनरशिपवरुनही मी नाराज आहे. ते अत्यंत धीम्या गतीने खेळले. आपण फिरकी गोलंदाजांच्या ३४ ओव्हर्समध्ये फक्त ११९ धावा केल्या. ही एक जागा आहे जिथे आपण सुधारण्याची गरज आहे. तिथे सकारात्मकता दिसली नाही’, असं सचिनने म्हटलं होतं.

मंगळवारी बांगलादेशचा पराभव केल्यानंतर सचिनने धोनीचं कौतुक करताना तो नेहमी संघाची विचार आधी करतो असं म्हटलं आहे. ‘मला वाटतं ती एक महत्त्वाची खेळी होती. जे संघासाठी योग्य आहे तेच त्याने केलं. जर धोनी ५० व्या ओव्हरपर्यंत टिकला तर तो त्याच्यासोबत खेळणाऱ्याला चांगली सोबत देऊ शकतो. तेच त्याने करणं अपेक्षित असून, कामगिरी चोख बजावत आहे’, अशी स्तुती सचिनने केली आहे.