पीटीआय, शांघाय

ऑलिम्पिक विजेत्या दक्षिण कोरियाला पराभवाचा धक्का देत धीरज बोम्मादेवरा, तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव या भारतीय संघाने पहिल्या टप्प्यातील विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेतील रिकव्‍‌र्ह प्रकारात रविवारी सुवर्णयश संपादन केले.

विश्वचषक स्पर्धेत भारताने तब्बल १४ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या रिकव्‍‌र्ह प्रकारात सांघिक सुवर्णपदकाची कमाई केली. महिला एकेरीत मात्र दीपिका कुमारीला रौप्यपदकावर समाधन मानावे लागले. भारताने या स्पर्धेत पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक मिळवले.

भारतीय संघाने १४ वर्षांपूर्वी या प्रकारात अखेरचे सुवर्णपदक मिळवले होते. त्या वेळी भारतीय संघाचा भाग राहिलेल्या तरुणदीप याने यंदा वयाच्या ४०व्या वर्षीही ऐतिहासिक सुवर्णयशात महत्त्वाची भूमिका बजावली. त्या वेळी तरुणदीप, राहुल बॅनर्जी आणि जयंत तालुकदार यांच्या भारतीय संघाने जपानला हरवले होते.

हेही वाचा >>>CSK vs SRH : गायकवाड, देशपांडे चमकले; चेन्नईची हैदराबादवर सहज मात

यंदा पहिली दोन मानांकने लाभलेल्या संघांत झालेली अंतिम लढत दुसऱ्या मानांकित भारतीय संघाने ५-१ अशी जिंकली. पहिला सेट ५७-५७ असा बरोबरीत सुटल्यावर उर्वरित दोन सेटमध्ये भारताने ५७-५५ आणि ५५-५३ अशी बाजी मारली. धीरज, तरुणदीप आणि महाराष्ट्राचा प्रवीण यांनी कमालीच्या शांतचित्ताने लक्ष्यभेद करताना कोरियाविरुद्ध एकही सेट गमावला नाही. कोरियन संघात किम वूजीन, किम जे देओक आणि ली वू सेओक यांचा समावेश होता. 

त्यानंतर अंकिता भकत आणि धीरजने मिश्र दुहेरीत मेक्सिकोच्या अलेहांड्रा वेलेंन्सिया-मतियास ग्रँडे जोडीचा ६-० (३५-३१, ३८-३५, ३९-३७) असा पराभव करून कांस्यपदकाची कमाई केली.

महिलांच्या वैयक्तिक प्रकारात भारताच्या दीपिका कुमारीला सुवर्णपदकाची संधी होती. मात्र, उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत दोन कोरियन खेळाडूंना पराभूत केल्यावर सुवर्णपदकाच्या लढतीत दीपिका कोरियन खेळाडूसमोरच अडखळली. तिला आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेत्या लिम शियेऑनविरुद्ध ०-६ असा पराभव पत्करावा लागला. सुवर्णपदकाच्या लढतीत दीपिकाची सुरुवातच अपयशी झाली. दुसऱ्या संधीला तिचा बाण केवळ ७ गुणांचा वेध घेऊ शकला. लिमने मात्र आपला प्रत्येक बाण अचूक मारत दीपिकाला पुनरागमाची संधी दिली नाही.

ऑलिम्पिकची संधी वाढली

तिरंदाजीत एका दशकाहून अधिक काळ आपली मक्तेदारी राखलेल्या कोरियाचा पराभव करत भारतीय पुरुष संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याच्या आपल्या आशांना बळ दिले आहे. पॅरिस ऑलिम्पिक पात्रतेची अखेरची

संधी तिसऱ्या टप्प्यातील विश्वचषक स्पर्धेनंतर उपलब्ध होईल. त्या वेळी आंतरराष्ट्रीय सांघिक मानांकनानुसार प्रथम दोन संघांना पात्र धरण्यात येईल. ही तिसऱ्या टप्प्यातील स्पर्धा १८ ते २३ जून दरम्यान तुर्कीत अंताल्या येथे खेळवली जाणार आहे.