वृत्तसंस्था, दोहा : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या नव्या पर्वास गतविजेता फ्रान्सचा संघ मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरुवात करेल, तेव्हा त्यांच्यासमोर अनुभव आणि कौशल्याच्या आघाडीवर खरे उतरण्याचे आव्हान असेल. ड-गटातील हा पहिलाच सामना असेल. तारांकित आघाडीपटू करीम बेन्झिमाचे जायबंदी होणे आणि स्पर्धेबाहेर पडणे फ्रान्ससाठी जरूर धक्कादायक असेल. मात्र, त्यानंतरही खेळामध्ये असलेली गती, रचना, अनुभव आणि कौशल्याची फ्रान्स संघात कमी नाही. याच आघाडय़ांवर खरे उतरणे हे फ्रान्ससाठी महत्त्वाचे असेल. कुठल्याही संघात चपखल बसतील असे किलियन एम्बापे, अँटोन ग्रीझमान, ऑलिव्हियर जिरूड असे एकापेक्षा एक सरस खेळाडू फ्रान्सच्या संघात आहेत. या तिघांनी मिळून आंतरराष्ट्रीय स्तरावर ११९ गोल केले आहेत. फ्रान्सला मध्यरक्षकांची काहीशी चिंता आहे. या कमतरतेचा फायदा घेण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल.

तुलनेत ऑस्ट्रेलियाची ताकद ही मध्यरक्षकांच्या कामगिरीतच अधिक आहे. आरोन मॉयच्या कामगिरीवर ऑस्ट्रेलियाची भिस्त असेल. प्रतिस्पर्ध्याच्या चालींना आव्हान देण्याची आणि अचूक पास देत आघाडीपटूंसाठी गोलची संधी निर्माण करण्याची मॉयमध्ये क्षमता आहे. तसेच मॅथ्यू लेकीने ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक गोल केले आहेत. हे दोन्ही खेळाडू असले, तरी ऑस्ट्रेलियाला मार्टिन बॉयलची उणीव भासेल. बॉयलला गुडघ्याच्या दुखापतीमुळे रविवारीच माघारी परतावे लागले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची ताकद काहीशी कमी झाली आहे. 

मध्यरक्षकांमध्ये अनुभवाची कमतरता

चार वर्षांपूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सने ऑस्ट्रेलियाला नमवले होते; परंतु सर्व प्रमुख खेळाडूंचा संघात समावेश असतानाही फ्रान्सला विजयासाठी झगडावे लागले होते. त्यात आता फ्रान्सला एन्गोलो कान्टे आणि पॉल पोग्बा या तारांकित मध्यरक्षकांना दुखापतींमुळे गमवावे लागले आहे. बचावात्मक मध्यरक्षक म्हणून फ्रान्स या वेळी अ‍ॅड्रियन रॅबिओ या खेळाडूसह सज्ज आहे. रॅबिओ या सामन्यात ऑरेलियन टिचोयुमेनी, एडुआडरे कामाविंगा आणि माटेओ गुएन्डोझी यांच्यापैकी एकासह मध्यरक्षकाची भूमिका बजावेल. मात्र, या मध्यरक्षकांमध्ये अनुभवाची कमतरता असून याचा फ्रान्सला फटका बसू शकेल. 

फ्रान्सच्या संघाची रचना : ४-२-३-१

ऑस्ट्रेलिया संघाची रचना : ४-३-३

  • वेळ : मध्यरात्री १२.३० वा.
  • थेट प्रक्षेपण :  १, १ एचडी, स्पोर्टस १८ खेल, जिओ सिनेमा
  • स्थळ : एल जानोब स्टेडियम