आव्हान टिकवण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकणे आवश्यक
‘फिफा’ विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धेतील आतापर्यंतच्या चारही सामन्यांत निराशाजनक कामगिरी करणारा भारतीय संघ विजयापासून वंचित राहिला आहे. त्यामुळेच मंगळवारी होणाऱ्या बलाढय़ ओमानविरुद्धच्या सामन्यात भारताला आव्हान टिकवण्यासाठी झगडावे लागणार आहे.
‘फिफा’च्या क्रमवारीत ८४ व्या स्थानावर असलेल्या ओमानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सुनील छेत्रीने २४ व्या मिनिटाला गोल साकारून भारताला आघाडी मिळवून दिली होती. परंतु अखेरच्या १० मिनिटांत दोन गोल नोंदवून ओमानने सामन्याचे चित्र पालटण्याची किमया साधली होती. त्यामुळे गुवाहाटीत झालेल्या या सामन्यासह भारताच्या विश्वचषक पात्रता अभियानाचा १-२ अशा पराभवाने प्रारंभ झाला. ओमानचा संघ १४ नोव्हेंबरला बांगलादेशवर ४-१ असा दणदणीत विजय मिळवून आत्मविश्वासाने भारताशी पुन्हा सामना करणार आहे.
भारताने पात्रता स्पर्धेत मग आशियाई विजेत्या कतारशी गोलशून्य बरोबरी साधली. त्यानंतर क्रमवारीत निम्न स्थानावर असलेल्या बांगलादेश आणि अफगाणिस्तानला भारताने १-१ असे बरोबरीत रोखले. या दोन्ही सामन्यांत उत्तरार्धातील गोलमुळे भारताला निसटती बरोबरी साधता आली होती. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अदिल खानने ८८व्या मिनिटाला गोल केला, तर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात सेमिनलेन डाँगेलने भरपाई वेळेत ९३व्या मिनिटाला गोल केला.
चारही सामन्यात भारताच्या आक्रमण आणि बचाव अशा दोन्ही फळ्या झगडताना आढळल्या. भारतीय संघ गोलसाठी फक्त छेत्रीवर अवलंबून नाही, हे सिद्ध झाले आहे. परंतु मिळालेल्या संधींचे गोलमध्ये रूपांतर करण्यात येणाऱ्या अपयशाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. भारताला अनुभवी मध्यवर्ती बचावपटू असान ईडाथॉडिकाची उणीव तीव्रतेने भासणार आहे. याचप्रमाणे दुखापतीमुळे संदेश झिंगान, रॉवलिंग बोर्गेस आणि अमरजित सिंग या खेळाडूंचाही भारतीय संघात समावेश नाही.
भारताने ओमानविरुद्ध बरोबरीचा किमान एक गुण मिळवल्यास २०२३मध्ये होणाऱ्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रतेच्या तिसऱ्या फेरीत थेट प्रवेश मिळू शकेल. कारण खंडांवर आधारित विश्वचषक पात्रता स्पर्धेला आशियाई पात्रतेचाही दर्जा लाभला आहे.
गुवाहाटीत भारताशी सामना करणाऱ्या ओमानची कामगिरी आता आणखी उंचावली आहे. त्यामुळे त्यांचे पारडे जड आहे. त्यामुळे भारतासाठी हा सामना आव्हानात्मक असेल, याची पूर्ण जाणीव आम्हाला आहे. – इगोर स्टिमॅच, भारताचे प्रशिक्षक
गुवाहाटीतील १-२ अशा पराभवाआधी चालू वर्षांत संयुक्त अमिराती येथे झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताने गोलशून्य बरोबरी साधली. २०१८च्या विश्वचषक पात्रता स्पर्धेत भारताने दोन सामन्यांत अनुक्रमे ०-३ आणि १-२ अशी हार पत्करली होती.
..तर पात्रतेच्या आशा संपुष्टात
ई-गटात समावेश असलेला भारतीय संघ ३ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंतच्या ४ सामन्यांपैकी ३ सामने बरोबरीत सोडवले आहेत, तर एक पराभव पत्करला आहे. कतारचा (१० गुण) संघ गटात अग्रस्थानी असून ओमान (९ गुण) दुसऱ्या स्थानावर आहे, तर अफगाणिस्तान (४ गुण) तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे ओमानविरुद्ध विजय मिळवल्यास इगोर स्टिमॅच यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाच्या पात्रतेच्या आशा जिवंत राहतील. परंतु पराभव पत्करल्यास २०२२च्या ‘फिफा’ विश्वचषक पात्रतेच्या आशा जवळपास संपुष्टात येतील. हा सामना बरोबरीत सोडवणेही भारतासाठी पुरेसा नसेल. भारताने ओमानविरुद्धचा सामना गमावल्यास भारताचे आव्हान बिकट असेल. कारण कतार, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्याविरुद्धचे उर्वरित तीन सामने जरी जिंकले तरी भारताला ९ गुण मिळवता येतील. ते गटात अग्रस्थान मिळवण्यासाठी अपुरे ठरतील. प्रत्येक गटातील उपविजेत्या संघालाही पात्रतेच्या तिसऱ्या फेरीत थेट प्रवेशाची हमी देता येणार नाही.