लंडन येथे सुरु असलेल्या वर्ल्ड हॉकी लीग सेमीफायनल स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसलाय. नेदरलँडच्या संघाने भारतावर ३-१ अशी मात केली आहे. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या नेदरलँडविरुद्धचा सामना भारतासाठी आव्हानात्मक ठरणार होता. सामन्याच्या सुरुवातीपासून नेदरलँडने खेळावर आपली पकड बसवली.

थेअरी ब्रिंकमॅनने सामन्याच्या अवघ्या दुसऱ्या मिनीटाला भारतीय संघाच्या बचावफळीमधला समन्वय उघडा पाडला आणि नेदरलँडला आघाडी मिळवून दिली. या सामन्यात भारतीय संघाने आपल्या जुना चुकांची पुनरावृत्ती केली. नेदरलँडचे खेळाडू हे आपल्या चपळ खेळासाठी ओळखले जातात. तरीही अशा संघासोबत खेळताना भारताचे बचावपटू कोणत्याही जोशात दिसले नाही. याचाच फायदा नेदरलँडच्या संघाने घेतला.

आज भारताने गोलरक्षक विकास दाहियाऐवजी महाराष्ट्राच्या आकाश चिकटेला संघात स्थान दिलं. मात्र प्रत्यक्ष सामन्यात त्याला फार काही चमक दाखवता आली नाही. एकापाठोपाठ एक हल्ले करण्याचं सत्र नेदरलँडच्या संघाने काही केल्या थांबवलं नाही. १२ व्या मिनीटाला सँडर ब्राट आणि २४ व्या मिनीटाला मिरको प्रुजिसेरने बॉल गोलपोस्टमध्ये ढकलून भारतीय संघाच्या मर्यादा स्पष्ट केल्या.

संपूर्ण सामन्यात भारतीय संघ कुठेही ताळमेळ दिसला नाही. डी-एरियात भारताच्या गोलरक्षकाला एकटं सोडण्याची जुनी खोड भारतीय संघाला पुन्हा नडली. नाही म्हणायाला आघाडीच्या एस.व्ही.सुनील आणि आकाशदीप सिंहने काही चाली रचत नेदरलँडचा बचाव फोडण्याचा प्रयत्न केला खरा मात्र गोलरक्षक पिरमीन ब्लाकने भारताचे सगळे मनसुबे उधळून लावले.

पूर्ण सामन्यात भारताला बरोबरी करण्याच्या अनेक संधी मिळाल्या होत्या. मात्र ड्रॅगफ्लिकींग सेक्शनमध्ये रुपिंदरपाल सिंहची गैरहजेरी भारताला प्रकर्षाने जाणवली. हरमनप्रीत सिंहने घेतलेला प्रत्येक ड्रॅगफ्लिकचा फटका नेदरलँडचा गोलरक्षक पिरमीन ब्लाकने मोठ्या शिताफीने अडवला. भारताकडून एकमेव गोल झळकवला तो आघाडीच्या फळीतल्या आकाशदीप सिंहने. बाकी सर्व खेळाडूंना आजच्या सामन्यात फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.

या पराभवामुळे ब गटात भारताचा संघ ९ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. त्यामुळे पुढच्या फेरीत भारताची गाठ कोणत्या संघाशी पडणार आणि भारत आपल्या कामगिरीत सुधारणा करणार का हे पहावं लागेल.