जागतिक मालिकेचा अंतिम टप्पा : सिंधूला उपविजेतेपद

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या सिंधूला मागील काही काळात जेतेपदाने हुलकावणी दिली आहे.

आन सेयंगकडून सरळ गेममध्ये पराभूत

बाली : भारताच्या दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूला जागतिक बॅडिमटन मालिकेच्या अंतिम टप्प्यात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तिला कोरियाच्या आन सेयंगने सरळ गेममध्ये पराभूत केले.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या सिंधूला मागील काही काळात जेतेपदाने हुलकावणी दिली आहे. रविवारी झालेल्या अंतिम लढतीत १९ वर्षीय सेयंगने तिचा २१-१६, २१-१२ असा पराभव केला. ४० मिनिटे चाललेल्या या लढतीत सिंधूला सेयंगचा बचाव भेदता आला नाही किंवा तिने केलेल्या वेगवान खेळाचे उत्तरही देता आले नाही. सिंधूची सरळ गेममध्ये पराभूत होण्याची ही सलग तिसरी वेळ ठरली.

सिंधूने वर्षांअखेरीस होणाऱ्या या स्पर्धेचे २०१८ मध्ये जेतेपद पटकावले होते. यंदा अंतिम लढतीत तिला चांगला खेळ करता आला नाही. पहिल्या गेममध्ये सुरुवातीलाच ती ०-४ अशी मागे पडली. सेयंगने वेगवान पद्धतीने खेळ करत १६-८ अशी आघाडी घेतली. यानंतर सिंधूने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला; पण सेयंगला हा गेम २१-१६ असा जिंकण्यात यश आले.

दुसऱ्या गेमच्या सुरुवातीला सिंधूकडे ५-४ अशी आघाडी होती. यानंतर मात्र तिचा खेळ खालावला. सेयंगने मध्यंतराला ११-८ अशी आघाडी घेतली आणि अखेर हा गेम २१-१२ असा जिंकला.

आन सेयंग खूपच चांगली खेळाडू आहे. त्यामुळे मी संघर्षपूर्ण अंतिम सामन्यासाठी तयार होते. मी तिला सुरुवातीपासून मोठी घेण्यापासून रोखले पाहिजे होते. मी नंतर सलग गुण मिळवत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. – पी. व्ही. सिंधू

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: World tour finals pv sindhu finishes runners up after losing in final zws