बेलग्रेड : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील यशस्वी कामगिरीनंतर जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत मात्र भारतीयांची निराशाजनक कामगिरी कायम राहिली. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या रविकुमार दहियाचे आव्हान सुरुवातीलाच संपुष्टात आले. फ्री-स्टाइल प्रकारात आता नवीन मलिकला (७० किलो) कांस्यपदकाची संधी आहे.

भारताच्या आशा प्रामुख्याने बजरंग पुनिया, रविकुमार दहिया आणि दीपक पुनिया यांच्यावर होत्या. मात्र, स्पर्धेपूर्वी सरावादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे विनोद पुनियाला माघार घ्यावी लागली. रवि दहिया (५७ किलो) पात्रता फेरीतच पराभूत झाला. त्यामुळे आता भारताच्या आशा ६५ किलो वजनी गटात बजरंगवर अवलंबून असतील. बजरंगची लढत शनिवारी होणार आहे.

रविकुमारला पात्रता फेरीत उझबेकिस्तानच्या गुलोजॉन अब्दुल्लाएवकडून एकतर्फी लढतीत ०-१० असा तांत्रिक आघाडीवर पराभव पत्करावा लागला. त्यानंतर गुलोजॉनचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आल्यामुळे रविच्या रेपिचेजमधून संधी निर्माण होण्याच्या आशाही मावळल्या.

नवीन मलिकला ७० किलो वजन गटात पात्रता फेरीतच जपानच्या ताशी नारीकुनीकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर ताशीने अंतिम फेरी गाठल्यामुळे नवीनला रेपिचेजमधून संधी निर्माण झाली. मात्र, नवीनला रेपिचेजमध्ये दोन लढती खेळाव्या लागल्या. पहिल्या लढतीत नवीनने कझाकस्तानच्या सिरबाज तटगटला ११-३ असे सहज हरवले. दुसऱ्या लढतीत उझबेकिस्तानचा इलियाझ बेकबुलाटोवने दुखापतीमुळे नवीनला पुढे चाल दिली. आता कांस्यपदकाच्या लढतीत नवीनची गाठ किर्गीझस्तानच्या एर्नाझर अकमाटालीएवशी पडणार आहे.

दरम्यान, सागर जगलन (७४ किलो), विकी हुडा (९२ किलो) यांना पराभवाचा सामना करावा लागला. विकीचा प्रतिस्पर्धीही पुढे वाटचाल कायम राखू शकला नाही. त्यामुळे विकीचे आव्हान संपुष्टात आले. सागरला अमेरिकेच्या काईल डेकने पराभूत केले. डेकने अंतिम फेरी गाठल्यास सागरला रेपिचेजमधून संधी निर्माण होईल.

दुखापतीमुळे निशाचे कांस्यपदक हुकले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुडघ्याच्या दुखापतीने निर्णायक क्षणी डोके वर काढल्यामुळे महिलांच्या ६८ किलो वजनी गटात भारताच्या निशा दहियाला कांस्यपदक गमवावे लागले. निशाची दुखापत जुनीच होती. त्यामुळे तिला या वर्षी मानांकन मालिकेतही खेळता आले नव्हते. उपचारानंतर निशा जागतिक स्पर्धेत उतरली होती. मात्र, कांस्यपदकाच्या लढतीत कॅनडाच्या लिंडा मोराएसविरुद्ध ४-० अशा आघाडीवर असताना गुडघा दुखावल्याने तिला वेदना असह्य झाल्या. त्याचा फायदा घेत लिंडाने निशाला चितपट केले. निशाच्या दुखापतीवर दिल्लीत उपचार करण्यात येणार आहेत.