भारतीय संघात यष्टीरक्षकाची जबाबदारी पार पाडलेला वृद्धिमान साहा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. साहाचा क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालशी (सीएबी) वाद झाला सुरू आहे. त्यामुळे त्याने बंगालचा संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तो ‘प्लेयर कम गाईड’च्या भूमिकेसाठी त्रिपुराशी चर्चा करत आहे. एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, “त्याला त्रिपुरासाठी खेळाडू आणि मार्गदर्शक अशा दोन्ही जबाबदाऱ्या घेण्याची इच्छा आहे. त्रिपुरातील सर्वोच्च क्रिकेट परिषदेतील काही सदस्यांशी याबाबत त्याची चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप ठोस निर्णय झालेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, “वृद्धिमान साहाला सीएबीकडून आणि नंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ना-हरकत पत्र प्राप्त करावे लागेल. त्यानंतरच बाकीची प्रक्रिया पुढे जाऊ शकते. याबाबत त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी संघातून वगळल्यानंतर साहाने रणजी करंडक स्पर्धेत खेळण्यासही नकार दिला होता. आयपीएलमध्ये मात्र, त्याने गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून देण्यात साहाने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

हेही वाचा – विश्वचषक विजेता फलंदाज पेट्रोल पंपावर वाटतोय चहा! का ते वाचा

यानंतर सीएबीचे संयुक्त सचिव देवव्रत दास यांनी साहाच्या खेळाप्रती असलेल्या बांधिलकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यामुळे अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज नाराज झाला. आयपीएलनंतर झालेल्या झारखंडविरुद्धच्या रणजी करंडकातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यासाठी साहाची बंगालच्या संघात निवड करण्यात आली होती. मात्र, ही निवड त्याच्या इच्छेविरुद्ध झाली होती. त्यामुळे त्याने खेळण्यास नकार दिला होता.

वृद्धिमान साहाने सीएबीला कडाडून विरोध केला आणि दास यांनी आपली माफी मागावी, अशी मागणी केली. त्यानंतर त्याने बंगालकडून पुन्हा खेळणार नसल्याचेही स्पष्ट केले. २००७ मध्ये बंगालकडून पदार्पण करणाऱ्या साहाने १२२ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. प्रदीर्घकाळानंतर त्याने बंगालचा संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wriddhiman saha decided to leave the bengal team and move to tripura vkk
First published on: 20-06-2022 at 10:21 IST