महेंद्रसिंह धोनीने कसोटी संघातून निवृत्ती घेतल्यानंतर वृद्धीमान साहाला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळालं. यानंतर साहाने आपल्या खेळाने संघ व्यवस्थापनाची मनं जिकंत आपली जागा पक्की केली आहे. भारताच्या आगामी श्रीलंका मालिकेसाठी साहा सध्या सराव करतोय. यावेळी हिंदुस्थान टाईम्स या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान साहाने महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्ताविषयी भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

”धोनी कधी निवृत्त होईल हा त्याचा प्रश्न आहे, तो निर्णय त्यालाच घेऊ द्या. प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत एक वाईट काळ येतोच, ज्यात त्या खेळाडूची कामगिरी चांगली होत नाही. मात्र तरीही तो खेळाडू संघाच्या विजयात कसा हातभार लावतोय हे पाहणंही महत्वाचं असतं. १० पैकी १० सामन्यांमध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला चांगली कामगिरी करता येईल असं नाही. त्यामुळे धोनीने कधी निवृत्त व्हावं हा त्याचा प्रश्न आहे.”

२०१० साली आंतराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केलेल्या साहाला धोनी संघात असेपर्यंत फार सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र २०१४ साली धोनीने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर साहाची कसोटी संघात वर्णी लागली होती. हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत याव्यतिरीक्त साहाने कर्णधार कोहलीच्या नेतृत्वाचंही कौतुक केलं आहे.

२६ जुलैपासून सुरु होणाऱ्या आगामी श्रीलंका दौऱ्यात भारत ३ कसोटी, ५ वन-डे आणि १ टी-२० सामना खेळणार आहे. चॅम्पियन्स करंडकापाठोपाठ वेस्ट इंडिज दौऱ्यातही महेंद्रसिंह धोनीला फारशी चमकदार कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे धोनीच्या जागेवर वन-डे संघात पर्याय शोधण्याची मागणी हळूहळू जोर धरु लागली होती. या पार्श्वभूमीवर साहाने केलेलं वक्तव्य नक्कीच महत्वाचं मानलं जातंय.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wriddhiman saha speaks about ms dhoni retirement in odi
First published on: 15-07-2017 at 17:29 IST