WTC Points Table Update After IND vs ENG 5th Test: ओव्हल कसोटी सामन्यात भारतीय संघाने शेवटपर्यंत कडवी झुंज दिली आणि इंग्लंडला धावा काढण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले. परिणामी टीम इंडियाने ओव्हल कसोटीत इंग्लंडवर ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला आहे. भारताने पाचव्या दिवसाच्या पहिल्याच षटकात दोन चौकार दिले, पण त्यानंतर मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा यांनी भेदक गोलंदाजी करत इंग्लंड संघाची झोप उडवली. या विजयानंतर टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आली आहे. वर्ल़्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे.
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने ओव्हल कसोटी विजयासह २-२ अशी बरोबरी साधली. हेडिंग्ले कसोटीत भारताला पराभव पत्करावा लागला. यानंतर बर्मिंगहम कसोटीत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला. लॉर्ड्स कसोटीत टीम इंडिया थोडक्यासाठी पराभूत झाली. मँचेस्टर कसोटी सामना अनिर्णित राहिला. तर ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला चकित करत दणदणीत विजय मिळवला.
भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेचं चित्र बदललं आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनी आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि तिन्ही जिंकले आहेत. त्यांची टक्केवारी १०० टक्के आहे. यानंतर, श्रीलंकेचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेने आतापर्यंत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दोन सामने खेळले आहेत आणि त्यात एक जिंकला आहे, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे ६६.६७ अशी संघाची टक्केवारी आहे.
WTC गुणतालिकेत भारताने इंग्लंडला टाकलं मागे
चौथ्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघ चौथ्या स्थानी घसरला होता आणि इंग्लंड तिसऱ्या स्थानी होता. पण ओव्हल कसोटीतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघ ४६.६७ टक्केवारीसह तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. भारताने ५ सामन्यांपैकी २ सामने गमावले आणि २ सामने जिंकले आहेत. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. तर इंग्लंड संघाची टक्केवारी ४३.३३ असून संघ चौथ्या स्थानी घसरला आहे. इंग्लंडनेही पाचपैकी २ सामने जिंकले आहेत आणि दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला आणि एक सामना अनिर्णित राहिला.

बांगलादेश संघ सध्या गुणतालिकेत ५ व्या क्रमांकावर आहे. त्यांनी दोन सामने खेळले आहेत. त्यापैकी एक सामना गमावला आहे आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. वेस्ट इंडिज संघ शेवटच्या म्हणजेच सहाव्या स्थानावर आहे. संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत, त्यापैकी एकही जिंकलेला नाही. त्यामुळे त्यांची टक्केवारी शून्य आहे.