NZ vs ZIM: न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील दुसरा सामना बुलावायोमध्ये पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने झिम्बाब्वेवर ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सामना न्यूझीलंडने ३५९ धावांनी आपल्या नावावर केला. हा न्यूझीलंडसाठी कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय आहे. तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील तिसरा सर्वात मोठा विजय आहे.

या सामन्यात फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या चार फलंदाजांनी १५० हून अधिक धावांची खेळी केली. या दमदार खेळीच्या बळावर न्यूझीलंडने ३ गडी बाद ६०१ धावांचा डोंगर उभारला आणि डाव घोषित केला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वेला पहिल्या डावात १२५ तर दुसऱ्या डावात अवघ्या ११७ धावा करता आल्या.

यासह न्यूझीलंडने हा सामना एक डाव आणि ३५९ धावांनी आपल्या नावावर केला. न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना जॅक फॉल्क्सने सर्वाधिक ५ गडी बाद केले. न्यूझीलंडने कसोटी क्रिकेटमधील तिसरा सर्वात मोठा विजय मिळवला तरीसुद्धा त्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतालिकेत एकही गुण मिळालेला नाही. काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत गुण न मिळण्याचं कारण काय?

न्यूझीलंड संघासाठी हा सर्वात मोठा विजय असला तरीदेखील त्यांना एकही गुण दिला गेला नाही. यामागचं कारण म्हणजे, अफगाणिस्तान, आयर्लंड आणि झिम्बाब्वे हे संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा भाग नाहीत. त्यामुळे या संघाविरुद्ध मिळवलेला विजय ग्राह्य धरला जात नाही.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा ही कसोटी क्रिकेटमधील वर्ल्डकप स्पर्धा आहे. २०१९ मध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली होती. ज्यावेळी ही स्पर्धा सुरू करण्यात आली. त्यावेळी आयसीसी रँकिंगमध्ये टॉप ९ मध्ये असणाऱ्या संघांना या स्पर्धेत प्रवेश देण्यात आला होता. ज्यात भारत, इंग्लंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका , वेस्ट इंडिज , श्रीलंका आणि बांगलादेश या ९ संघांचा समावेश आहे. जे संघ टॉप ९ मध्ये नाहीत, अशा संघाविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या मालिका जिंकल्या तरीदेखील गुण दिला जात नाही. याआधी दक्षिण आफ्रिकेनेही झिम्बाब्वेचा पराभव केला होता. त्यांना देखील गुण दिला गेला नव्हता.