वेस्ट इंडिजमध्ये ICC T20 महिला विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत भारताने सलामीची दोन सामने जिंकले असून पुढील सामना १५ नोव्हेंबरला आयर्लंडशी होणार आहे. पहिल्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीतने आपल्या फलंदाजीचा धडाका दाखवून दिला आणि भारताला विजय मिळवून दिला. तर दुसऱ्या सामन्यात मिताली राजने भारताला अनुभवाच्या जोरावर विजय मिळवून दिला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलाच. पण याबरोबरच भारतीयांचा आनंद द्विगुणित करणारीही एक गोष्ट या सामन्यात झाली. मितालीने अर्धशतकी खेळीबरोबरच भारताच्या पुरुष संघाचा कर्णधार रोहित शर्माला पिछाडीवर टाकले आणि टी२० मध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला.

पाकने दिलेल्या १३३ धावांचे लक्ष्य भारताने ७ गडी राखून पूर्ण केले. या आव्हानचा पाठलाग करताना भारताकडून मिताली राजने ४७ चेंडूत ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर स्मृती मनधानाने २८ चेंडूत २६ धावा केल्या. त्यामुळे भारताच्या विजयाचा पाया रचला गेला. भारतीय संघाने न्यूझीलंडपाठोपाठ पाकिस्तानलाही नमवून गटात आपले स्थान भक्कम केले आहे.

या सामन्यात भारताची माजी कर्णधार आणि आघाडीची फलंदाज मितालीने अर्धशतकी खेळीबरोबरच भारताच्या पुरुष संघाचा कर्णधार रोहित शर्माला पिछाडीवर टाकले. तिने टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या भारतीय खेळाडूंच्या क्रमवारीत रोहितला मागे टाकले. मितालीने टी२० क्रिकेटमध्ये २२३२ धावा केल्या आहेत. मितालीच्या या फटकेबाजीसमोर कर्णधार विराट कोहलीही पिछाडीवर पडला आहे.

मितालीने ८४ सामन्यात १६ अर्धशतकांसह २२३२ धावा केल्या आहेत. तिने या आकडेवारीत कोहलीला आधीच पिछाडीवर टाकले होते. पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तिने रोहितला मागे टाकले. रोहितच्या नावावर ८७ सामन्यांत सर्वाधिक २२०७ धावा आहेत, कोहलीच्या नावावर २१०२ धावा आहेत.