भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये खेळवला जात आहे. मँचेस्टर कसोटी सामन्याची नाणेफेक इंग्लंडने जिंकत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारताकडून केएल राहुल आणि यशस्वी जैस्वालची जोडी सलामीसाठी मैदानात उतरली. दरम्यान यशस्वी जैस्वालने शानदार फलंदाजी करत विक्रमी अर्धशतक झळाकवलं आहे.
यशस्ली जैस्वाल आणि केएल राहुल यांनी पहिल्या डावात चांगली फलंदाजी करत एकही विकेट गमावली नाही. यासह भारताने पहिल्या सत्रात बिनबाद ७८ धावांची खेळी केली. राहुल आणि जैस्वालने अर्धशतकी भागीदारी रचत भारताचा डाव सावरला होता. राहुल ४६ धावा करत दुसऱ्या सत्राच्या सुरूवातीला झेलबाद झाला. राहुल बाद होण्यापूर्वी त्याने जैस्वालसह ९६ धावांची भागीदारी रचली होती.
राहुल बाद झाल्यानंतर साई सुदर्शनच्या जोडीने यशस्वीने संघाचा डाव पुढे नेला. यशस्वी जैस्वालने ९६ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकारासह ५० धावा पूर्ण केल्या. यासह मँचेस्टर कसोटीत सुनील गावस्कर यांच्यानंतर अर्धशतक झळकावणारा तो पहिला भारतीय सलामीवीर ठरला. सुनील गावस्करांनी सलामीवीर म्हणून १९७४ मध्ये मँचेस्टरच्या मैदानावर कसोटीत अर्धशतक झळकावलं होतं, पण आता या यादीत यशस्वी जैस्वालचं नावही जोडलं गेलं आहे.
यशस्वी जैस्वालने आणखी एक मोठी कामगिरी केली. इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक अर्धशतकं करणारा तो तिसरा भारतीय सलामीवीर ठरला. या बाबतीत सुनील गावस्कर अव्वल स्थानावर आहेत. त्यांनी ६६ डावांमध्ये २० वेळा ५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे.
रोहितने २४ डावांमध्ये ८ वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वालने १६ डावांमध्ये ८ वेळा ५० धावा करून रोहित शर्माची बरोबरी केली आहे. या यादीत केएल राहुलचे नाव चौथ्या स्थानावर आहे. राहुलने इंग्लंडविरुद्ध ७ वेळा सलामीला उतरत २७ डावात ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
अर्धशतकी केल्यानंतर यशस्वी जैस्वाल स्लिपमध्ये झेलबाद झाला. इंग्लंडचा पुनरागमन करणाऱ्या नव्या फिरकी गोलंदाजाकडून बाद झाला. लायम डॉसनचा चेंडू त्याच्या बॅटची कड घेत स्लिपमध्ये उभ्या असलेल्या ब्रूकच्या हातात गेला आणि ५८ धावा करत झेलबाद झाला.