भारताने इंग्लंडविरूद्ध लॉर्ड्स कसोटीत दुसऱ्या डावात भेदक गोलंदाजी केली आहे आणि इंग्लंडच्या धावांवर अंकुश ठेवला आहे. भारताच्या सर्वच गोलंदाजांनी चांगलं योगदान दिलं आहे. दरम्यान नितीश रेड्डीने दुसऱ्या डावात आपल्या कमालीच्या गोलंदाजीच्या जोरावर संघाला जॅक क्रॉलीची विकेट मिळवून दिली. पण त्याच्या विकेटनंतर कौतुक मात्र यशस्वी जैस्वालचं केलं गेलं, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
मोहम्मद सिराजने २ विकेट्स घेत चौथ्या दिवशी संघाला चांगली सुरूवात करून दिली. यानंतर नितीश रेड्डी गोलंदाजीला आला. पहिल्या डावात एकाच षटकात भारताला दोन विकेट मिळवून देणाऱ्या नितीश रेड्डीने दुसऱ्या डावातही विकेट मिळवली. नितीश रेड्डीने जॅक क्रॉलीला झेलबाद केलं.
जॅक क्रॉलीने तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या षटकात वेळ वाया घालवण्यासाठी फार प्रयत्न करताना दिसला. यादरम्यान जॅक क्रॉली आणि शुबमन गिल यांच्यात मोठी वादावादी पाहायला मिळाली. अखेरच्या षटकातील वादामुळे मैदानावर मोठा ड्रामा झाला. याचा दबाव दुसऱ्या दिवशी जॅक क्रॉलीवर दिसून येत होता.
नितीश रेड्डीच्या १५व्या षटकात क्रॉली स्ट्राईकवर होता. नितीश रेड्डीच्या षटकातील चौथा चेंडू क्रॉली खेळण्यासाठी गेला आणि चेंडू बॅटची कड घेत गलीमध्ये उभ्या असलेल्या यशस्वी जैस्वालच्या दिशेने गेला आणि जैस्वालने कोणतीही चूक न करता अचूक झेल टिपला. विकेट घेतल्यानंतर नितीश रेड्डी क्रॉलीकडे पाहत गर्जना करत आक्रमक सेलिब्रेशन करताना दिसला.
नितीश रेड्डी क्रॉलीसमोर विकेटचं सेलिब्रेशन करत असताना तिथे संपूर्ण संघ यशस्वी जैस्वालचं कौतुक करत होता. पहिल्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वालने ४ झेल सोडले होते. यामुळे त्याला खूप ट्रोल केलं जात होतं. गली आणि स्लिपमध्येही त्याला फिल्डिंग दिली जात नव्हती. पण तिसऱ्या कसोटीत गलीमध्ये यशस्वीने चांगला झेल टिपला आणि त्यामुळे संपूर्ण संघ त्याचं कौतुक करतान दिसला. सर्वांनी त्याला शाबासकी दिली.