Yashasvi Jaiswal Century at Oval Video: भारत आणि इंग्लंड ओव्हल कसोटीत भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने शानदार फलंदाजी करत आपलं शतक झळकावलं. जैस्वालने या मालिकेतील पहिल्याच हेडिंग्ले कसोटीत शतक केलं होतं. आता जैस्वालने अखेरच्या कसोटीतील दुसऱ्या डावात शतक केलं आहे. शतकानंतर यशस्वीने एकच जल्लोष करत शतकाचं सेलिब्रेशन केलं आहे.
इंग्लंडविरुद्धच्या लीड्स कसोटी सामन्यात जैस्वालने १०१ धावांची खेळी केली. त्यानंतर, तीन कसोटी सामन्यांमध्ये तो फार प्रभावी खेळी करू शकला नाही. यादरम्यान जैस्वालने फक्त दोन अर्धशतकं झळकावली असली तरी, शेवटच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावून त्याने संघाला मजबूत स्थितीत आणलं आहे. यशस्वी जैस्वालच्या शतकानंतर केलेल्या सेलिब्रेशनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
यशस्वी जैस्वालचं ओव्हलच्या मैदानावर पहिलचं शतक
टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने ओव्हलच्या मैदानावर त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सहावं शतक झळकावलं. यापैकी त्याने इंग्लंडविरुद्ध चार शतकं झळकावली आहेत. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक शतक आणि वेस्ट इंडिजविरुद्ध एक शतक झळकावलंआहे. यशस्वीने १२९ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केलं.
यशस्वीने एक धाव घेत शतक झळकावल्यानंतर जोरात उडी मारत शतकाचा आनंद साजरा केला. यानंतर त्याने बॅट, हेल्मेट खाली ठेवून ग्लोव्हज काढले आणि फ्लाईंग किस देत सेलिब्रेशन केलं. यानंतर त्याने हाताने हार्ट तयार करून दाखवलं आणि पुन्हा फ्लाईंग किस दिलं. यानंतर तो करूण नायरच्या जवळ जाऊन त्याला मिठी मारली.
यशस्वी जैस्वालने सचिन-विराटला टाकलं मागे
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक २ हजार धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत यशस्वी जैस्वालने महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली यांना मागे टाकलं होते. एजबॅस्टन कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वालने २००० धावा पूर्ण केल्या. त्याने ४० व्या डावात हा विक्रम पूर्ण केला.
यासह, जैस्वाल सर्वात कमी डावांमध्ये संयुक्तपणे दोन हजार धावा पूर्ण करणारा भारताचा पहिला फलंदाज बनला. यापूर्वी, माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविड आणि माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांनी कसोटी क्रिकेटमध्ये समान डावांमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या होत्या.