भारतीय संघातील अष्टपैलू रविंद्र जाडेजाने फिरोजशहा कोटलाच्या मैदानावर आतापर्यंत पाच बळी मिळवले आहेत. अखेरच्या दिवशी पहिल्या डावात शतक साजरे करणाऱ्या मॅथ्थूजला त्याने अवघ्या १ धावावेर चालते केले. त्याने संघाच्या विजयातील एक मोठा अडथळा दूर केला. भारतीय संघाला विजय मिळवून देण्यासाठी जाडेजाची भूमिका महत्त्वपूर्ण अशीच आहे. बर्थडे दिवशी भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलण्यासाठी तो प्रयत्नशील असेल. कसोटी सामन्यात एका डावात पाच बळी मिळवणे, हा कोणत्याही गोलंदाजांसाठी आनंदाचा क्षण असतो. जाडेजाने चहापानापर्यंत पहिल्या डावात दोन आणि दुसऱ्या डावात तीन बळी मिळवले आहेत.
जाडेजाने २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणाच्या सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. मात्र, पहिल्या सामन्यात त्याने ६० धावांची दमदार खेळी केली होती. प्रथम श्रेणीत भारताकडून तीनवेळा त्रिशतक झळकवण्याचा पराक्रम जाडेजाच्या नावे आहे. त्यानंतर चेतेश्वर पुजाराने हा पराक्रम केला होता. प्रथम श्रेणीत सर्वाधिक त्रिशकांचा विक्रम हा सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावे आहे. ब्रॅडमन यांनी ६ त्रिशतके झळकावली आहेत.
भारत-श्रीलंका आणि इंग्लंड- ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यानंतर आयसीसीने जारी केलेल्या क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूच्या यादीत बांगलादेशचा शाकीब हसन ४३७ गुणांसह अव्वल स्थानी असून जाडेजा (४१४) आणि आर अश्विन ३८८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.