खेळ कुठलाही असला तरी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार म्हटले की वातावरणाचा नूरच बदलतो. १४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या युवा (१९-वर्षांखालील) क्रिकेट विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान जेतेपदाचे प्रमुख दावेदार असणार आहेत आणि ते एकमेकांशी १५ फेब्रुवारीला भिडणार आहेत. उन्मुक्त चंद आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळवलेले जेतेपद कायम राखण्याचे आव्हान विजय झोलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासमोर
असणार आहे.
मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखालील संघाने २०००मध्ये तर सध्याच्या भारतीय संघाचा ‘रनमशीन’ ठरलेल्या विराट कोहलीच्या संघाने २००८मध्ये या स्पर्धेच्या जेतपदावर कब्जा केला होता. भारताप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या संघाने तीनदा जेतेपदाची कमाई केली आहे. दुसरीकडे पाकिस्तानने सलग दोनदा अर्थात २००४मध्ये खालिद लतीफच्या संघाने तर २००६मध्ये सर्फराज अहमदच्या नेतृत्त्वाखाली जेतेपद पटकावले होते. पाकिस्तानप्रमाणेच भारतीय संघाला गटातील स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनीचे आव्हान पार करायचे आहे.