आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या 18 ते 19 वर्षांच्या झंझावाती कारकिर्दीनंतर भारताचा लढवय्या क्रिकेटपटू युवराज सिंगनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने आपली निवृत्ती जाहीर केली. दरम्यान, यावेळी भावूक होत ही वेळ माझ्यासाठी महत्त्वाची आणि कठीण असल्याचे त्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कधीही हार मानायची नाही, खाली पडलो तरी धूळ झटकत पुन्हा उभारी घ्यायची ही वृत्ती मी क्रिकेटकडूनच शिकलो असे तो म्हणाला. माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की मी वर्ल्ड कप खेळावं आणि तो जिंकावा, हे स्वप्न मी पूर्ण केलं आणि आजही तो माझ्या सगळ्यात आठवणीतला क्षण असल्याचं युवराज म्हणाला. 2011 मध्ये भारतानं वर्ल्ड कप जिंकला त्यावेळी युवराज सिंग मॅन ऑफ दी सीरिज होता तसेच चार सामन्यांमध्ये त्याला मॅन ऑफ दी मॅचनेही गौरवण्यात आले होते. यशाच्या शिखरावर असताना कॅन्सरनं आपल्याला गाठलं आणि कारकिर्द संपुष्टात येते की काय असा प्रसंग आल्याचे तो म्हणाला. मात्र, डॉक्टरांची मेहनत आणि कुटुंबीयांचे व चाहत्यांचे प्रेम यांच्या जीवावर आपण त्यावर मात केल्याचे तो म्हणाला. क्रिकेटच्या जीवनात खाली वर होण्याचे प्रसंग खूप आले, पण खाली जाण्याचे प्रसंग जास्ती आल्याचे त्याने भावूक होत सांगितले.

नेटवेस्टमध्ये अंतिम सामन्यात मिळवलेला विजय, लाहोरमध्ये ठोकलेलं शतक, वर्ल्ड कपमध्ये केलेली कामगिरी या आयुष्यभर पुरणाऱ्या आठवणी असल्याचं तो म्हणाला. ज्यावेळी मी यशाच्या शिखरावरून खाली आलो होतो आणि झगडत होतो त्यावेळी मी पुनश्च हरीओम केला, भरपूर सराव केला आणि स्थानिक सामन्यांमध्ये खोऱ्यानं धावा करून पुन्हा संघात येण्यासाठी झगडलो असं त्यानं सांगितलं. स्वत:वर विश्वास असेल तर तुम्ही जे अशक्य आहे ते ही साध्य करू शकता असा मूलमंत्र युवीनं तरूणांना दिला आहे.

सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, झहीर खान, आशिष नेहरा हे क्रिकेटविश्वातले आपले सोबती असल्याचे सांगताना सचिन माझा आदर्श होता, त्याच्यासोबत खेळायला मिळाल्याचा आनंद असल्याचे त्यानं सांगितलं. दरम्यान, निवृत्तीचा निर्णय आपल्यासाठी कठीण होता. माझ्या कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे युवराज म्हणाला. या निवृत्तीनंतर मी स्थानिक टी-20 सामने खेळत राहणार आहे. या खेळातून मला जे काही मिळालंय ते आयुष्यभरासाठी माझ्यासोबत राहिल, आज जे काही मिळालं त्याबद्दल मला अभिमान असल्याचाही तो म्हणाला

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuvraj announce his retirement from international cricket jud
First published on: 10-06-2019 at 13:59 IST