‘अति शहाणा, त्याचा बैल रिकामा’ या उक्तीचा प्रत्यय हरभजन सिंगच्या नेतृत्वाखालील उत्तर विभागाच्या संघाला आला. संघात एकापेक्षा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे नामांकित फलंदाज होते, त्यामुळे मध्य विभागाचे १६८ धावांचे आव्हान हरभजनला थिटे वाटत होते. त्यामुळेच बढती घेऊन तो तिसऱ्या क्रमांकावर आला आणि संघाच्या फलंदाजीची लय बिघडवत सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० लीगमध्ये ४ धावांनी पराभव पदरी पाडून घेतला.

महेश रावत व कर्णधार नमन ओझा (४८) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या मध्य विभागाने १६७ धावा उभारल्या. रावतने उत्तरेच्या भेदक गोलंदाजीचा सामना करत ४० चेंडूंत सहा चौकार व एका षटकारासह नाबाद ५७ धावा काढल्या. महेशला ४७ धावांवर शिखर धवनने सीमारेषेवर झेल सोडत जीवदान दिले.

त्यानंतर उत्तरेच्या डावात गौतम गंभीरचा (२०) अप्रतिम झेल सोहराब दलिवालने पकडून मध्य विभागाने पहिला धक्का दिला. गंभीरनंतर तिसऱ्या स्थानावर हरभजन फलंदाजीला आला आणि साऱ्यांनाच आश्चर्य वाटले. त्याची देहबोली या वेळी एवढी सुस्त होती की, ती पाहून हा कर्णधार संघाला विजय मिळवून देऊ शकत नाही, हे स्पष्ट जाणवत होते. एकदा धावचीत होताना हरभजन सुदैवी ठरला आणि चार चेंडूंत एकमेव धाव करून तंबूत परतला. फिरकीपटू कर्ण शर्माने पहिल्या तिन्ही फलंदाजांना बाद करताना फक्त १७ धावा दिल्या. उत्तरेला विजयासाठी १८ चेंडूंत ५२ धावा हव्या असताना युवराज सिंगने १८व्या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंवर षटकार लगावले व सामना रंगतदार झाला; पण षटकाच्या अखेरच्या चेंडूवर षटकार खेचण्याचा नादात तो झेलबाद झाला व उत्तरेच्या हातून सामना निसटला. युवराजने २० चेंडूंत ४ षटकारांसह ३३ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

मध्य विभाग : २० षटकांत ७ बाद १६७ (महेश रावत नाबाद ५७; आशीष नेहरा ३/२६) विजयी वि. उत्तर विभाग : २० षटकांत ६ बाद १६३ (शिखर धवन ३७, युवराज सिंग ३३; कर्ण शर्मा ३/१७).