scorecardresearch

युवराज सिंग-हेझल कीच झाले आई-बाबा; पुत्ररत्न प्राप्तीनंतर युवराज म्हणतो, “आम्ही यासाठी…”

युवराज सिंग आणि हेझल कीचचं लग्न नोव्हेंबर २०१६ मध्ये झालं आहे.

Yuvraj Singh Hazel Keech
युवराजनेच ट्विटरवरुन दिली माहिती (फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि त्याची पत्नी हेझल कीच यांना पुत्ररत्न प्राप्ती झालीय. यासंदर्भातील माहिती युवराजनेच ट्विटवरुन चाहत्यांना दिलीय. रात्री साडेअकराच्या सुमारास युवराजने ही गोड बातमी दिलीय.

“आमच्या सर्व चाहत्यांना, कुटुंबियांना आणि मित्रांना सांगताना आनंद होत आहे की आज आम्हाला देवाच्या कृपेने पुत्ररत्न प्राप्ती झालीय. आम्ही यासाठी देवाचे आभार मानतो. तसेच आम्ही आमच्या मुलाच्या जन्माचा आनंद साजरा करत असतानाच सर्वांकडून आपल्या खासगी आयुष्याचा सन्मान राखला जाईल अशी अपेक्षा करतो,” असं युवराजने ट्विटरवरुन म्हटलंय.

युवराज आणि हेझलचं लग्न नोव्हेंबर २०१६ मध्ये झालं आहे. क्रिकेट विश्व आणि बॉलिवूड हे नाते काही नवे नाही. बऱ्याच सेलिब्रिटींनी क्रिकेटपटूंशी विवाहबद्ध होत सहजीवनाच्या नव्या प्रवासाला सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. याच जोडप्यांमध्ये युवराज आणि हेझलचा समावेश होतो. हेजलने बॉलिवूडसोबतच काही टॉलिवूड चित्रपटांमध्येही भूमिका साकारली आहे. सलमान खान- करिना कपूर खान यांच्या ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटातून हेजलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यापूर्वी ‘हॅरी पॉटर’ या प्रसिद्ध चित्रपटात तिने हॉगवर्ट्समधल्या विद्यार्थिनीची भूमिका साकारली होती. ‘हॅरी पॉटर अँड द फिलोसॉफर्स स्टोन’, ‘हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स’ आणि ‘हॅरी पॉटर अँड द प्रिसनर ऑफ अझ्कबान’ या तीन चित्रपटांमध्ये हेजलने काम केलं होतं. ती २०१३ च्या ‘बीग बॉस’च्या पार्वामध्येही झळकली होती.

दुसरीकडे युवराज हा भारताला विश्वचषक जिंकवून देणाऱ्या संघाचा भाग होता. तसेच तो २००७ साली भारताने जिंकलेल्या पहिल्या वहिल्या टी-२० विश्वचषकाच्या विजयी संघाचा सदस्यही होता. २००७ साली टी-२० तर २०११ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वचषक जिंकणाऱ्या संघामध्ये युवराज होता. त्याने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर तो जगभरातील वेगवेगळ्या क्रिकेट लीगमध्ये खेळतोय.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Yuvraj singh hazel keech blessed with baby boy scsg

ताज्या बातम्या