भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंहचं भारतीय संघातल भवितव्य अंधारात असलं तरीही आगामी आयपीएलसाठी युवराज सिंह मुंबई इंडीयन्स संघाकडून खेळणार आहे. लिलावामध्ये मुंबईच्या संघाने अखेरच्या क्षणी युवराजवर बोली लावली. यंदाच्या हंगामात युवराज कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या डी. वाय. पाटील टी-20 स्पर्धेत युवराजची बॅट चांगलीच तळपली होती आणि आता त्याच्या फटकेबाजीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात त्याने मारलेला switch hit पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल….

एका मैत्रीपूर्ण सामन्यात एअर इंडिया संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने मालदिव क्रिकेट संघाविरुद्ध हा switch hit मारला. त्याचा हा फटका इतका जोरदार होता की चेंडू थेट सीमारेषेपार गेला. युवराजने जून 2017 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरचा वन डे सामना खेळला होता. त्यानंतर त्यानेरणजी करंडक स्पर्धेत पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले, परंतु त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. मात्र, आयपीएल स्पर्धेच्या तोंडावर त्याने आपली तंदुरूस्ती सिद्ध करताना काही तडाखेबाज खेळी केल्या आहेत.