भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे राहणार की, भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळणार ही चर्चा रंगत असताना झहीर खानने भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. जलदगती गोलंदाज झहीर खानने भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली. सध्या भारतीय क्रिकेट मंडळ आणि मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात धुसपूस सुरु असून, भारतीय क्रिकेटचे मुख्य प्रशिक्षक म्हणून ते कायम राहणार का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या भारतीय क्रिकेटमंडळाच्या प्रशासकीय समितीसमोर अनिल कुंबळे यांनी भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून झहीरच्या नावाला पसंती दिली होती. त्यानंतर आता झहीरने खुद्द त्यात रस दाखवला आहे.

९२ कसोटी सामने आणि दोनशे एकदिवसीय सामन्यांमध्ये झहीरने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने कसोटीमध्ये ३११ तर एकदिवसीयमध्ये २८२ बळी मिळवले आहेत. २०११ साली धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषकावर नाव कोरले. या विश्वचषक स्पर्धेत झहिर खान भारतीय संघाचा सदस्य राहिला आहे. दुखापतीमुळे झहीर भारतीय संघापासून बऱ्याच कालावधीपासून दूर होता. त्यानंतर त्याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारतीय संघाच्या गोलंदाजीची मुख्य धुरा साभाळल्यानंतर आता नव्या दमाच्या गोलंदाजांना शिकवणी देण्याची संधी भारतीय क्रिकेट मंडळ झहीरला देणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. झहीरने भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्याच्या अनुभवाचा पुरेपूर वापर करुन घेण्यासाठी प्रशिक्षकाच्या भूमिकेत तो उत्तम भूमिका पार पाडू शकतो. त्यामुळे बीसीसीआय भारतीय गोलंदाजीत धार आणण्यासाठी झहीरला निवडणे फायद्याचे ठरेल.

इंडियन प्रिमियर लिगच्या दहाव्या सिझनमध्ये झहीर खान दिल्ली डेअर डेव्हिल्सच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. याच दरम्यान त्याने अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत साखरपुडा केला. नव्या आयुष्याची सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा त्याला भारतीय संघासोबत मैदानात उतरण्याची इच्छा असल्याचे दिसते. आयुष्याची नवी इनिंग सुरु करण्यापूर्वी पुन्हा एकदा झहिरला ब्लू इंडियासोबत पाहणे त्याच्या चाहत्यासाठी आनंदाची गोष्ट असेल.