किरकोळ कारणातून बीसीसीआयने केलेली हर्षां भोगले यांची गच्छंती अनेकांना आवडली नाही, कारण आपल्या कामातून हर्षां भोगले यांनी क्रिकेट समीक्षकांमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.

काही वर्षांपूर्वीची गोष्ट.भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना चांगलाच रंगला होता. भारताची परिस्थिती चांगली होती, पण भारताने दोन विकेट्स गमावल्या. त्यावेळी समालोचन कक्षामध्ये बसलेले पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीझ राजा यांनी आपल्या संघाचे गोडवे गायला सुरुवात केली. ते गोडवे गाण्यात एवढे मग्न झाले की आपण समालोचक आहोत आणि समालोचक हा नि:पक्षपातीच असायला हवा, याचेही त्यांना भान राहिले नाही. त्यावेळी त्यांच्या बाजूला बसलेल्या एका भारतीय (मराठी) समालोचकाने त्याला याची जाणीव करून दिली. तुम्ही आता समालोचक वाटत नसून पाकिस्तानचे चाहते वाटत आहात, असे ते समालोचक रमीझ यांना म्हणाले. त्यानंतर रमीझ यांनी चूक मान्यही केली. ही आठवण झाली ती हर्षां भोगलेंमुळे. आयपीएलमधून त्यांची गच्छंती केली. पण यासाठी खरंच ते एक समालोचक म्हणून जबाबदार आहेत का, समालोचनामध्ये त्यांनी काही मोठी चूक केली आहे का, हा प्रश्न उपस्थित व्हायला हवा, पण हीच गोष्ट होताना दिसत नाही.

हर्षां हे काही वर्षे एपीसीएकडून क्रिकेट खेळले. त्यानंतर ते रेडिओसाठी समालोचनाचे काम करायचे. इंजिनीअरची पदवी त्यांच्याकडे होती. पण क्रिकेटचे वेड मात्र त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. हैदराबादमध्ये ऑल इंडिया रेडिओमध्ये ते काम करत. त्यांची कामावरची निष्ठा, ज्ञान आणि संभाषणचातुर्य याला तोड नव्हतीच. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाच्या ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने त्यांना १९९२ च्या विश्वचषकापूर्वी बोलावून घेतले. भारताकडून ऑस्ट्रेलियाला या कामासाठी जाणारे ते पहिले होते. त्यानंतर १९९२ च्या विश्वचषकात त्यांना फक्त १५ मिनिटे समालोचन करण्यासाठी मिळायची. या १५ मिनिटांमध्ये त्यांनी अशी काही श्रोत्यांवर मोहिनी घातली की हर्षांंची मागणी वाढायला सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव नसतानाही त्यांनी जेफ बॉयकॉट, सुनील गावस्कर, इयान चॅपेल, अ‍ॅलन विल्किन्स, रवी शास्त्री, संजय मांजरेकर यांसारख्या दिग्गजांच्या खांद्याला खांदा लावून समालोचन करत राहिले. क्रिकेट खेळले नसले तरी त्यांच्याकडे क्रिकेटकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी होती. काही जणांच्या मते त्यांची ही धडपड पाहत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी हर्षां यांना मदत केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर समालोचन करत असताना हर्षां कधीही अन्य समालोचकांपुढे कमी वाटले नाहीत. त्यांच्याकडे बोलण्याची, आपली मते मांडण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. सर्वसामान्य श्रोत्यांपासून ते क्रिकेटच्या निस्सीम चाहत्यांना त्यांचे समालोचन श्रवणीय वाटते. त्यांच्या बोलण्याचा वेगही राजधानी एक्स्प्रेससारखा. त्यामुळेच त्यांच्यासारखे समालोचन करणे किंवा त्यांच्या समालोचनाची नक्कल करणे अन्य कोणालाही जमले नाही.

१९९२ पासून हर्षां यांनी वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखनालाही सुरुवात केली. काही वेळा त्यांचे स्तंभ अचाट माहिती देऊन जायचे. हा माणूस क्रिकेटपटू नसला तरी किती छोटय़ा गोष्टींचा त्याचा अभ्यास आहे, अशी दाद बऱ्याचदा त्यांना मिळाली. कारण त्यांचे लिखाण हे परखड होते. कोणाच्याही बाजूने झुकलेले नव्हते. त्यामध्ये मिंधेपणा नव्हता, तर अभ्यासपूर्ण लिखाण होते. त्यामुळेच हर्षां यांच्या हकालपट्टीनंतर बऱ्याच जणांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण ज्या व्यक्तीने आंतरराष्ट्रीय स्तरावर एवढी वर्षे समालोचन केले, तो या घडीला बीसीसीआयला का नकोसा झाला? या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. १९९२-२०१६ अशी हर्षां यांची समालोचक म्हणून कारकीर्द नक्कीच स्तुतीसाठी पात्र. पण असे नेमके घडले काय, की त्यांना बीसीसीआयने समालोचन करण्यापासून परावृत्त केले.

काही जणांच्या मते ट्वेन्टी-२० विश्वचषकातील भारताचा पहिला सामना त्यासाठी कारणीभूत ठरला. नागपूरला हा सामना खेळवला गेला. फिरकीला पोषक खेळपट्टीवर भारताचे फलंदाज धारातीर्थी पडत होते. अनपेक्षितपणे भारताने हा सामना गमावला. फिरकीवर पोसलेल्या भारतीय फलंदाजांसाठी हा नक्कीच काळा दिवस होता. या सामन्यात हर्षां यांनी भारतीय संघावर टीका केली. एक समालोचक म्हणून ते त्यांचे कामच आहे, हे आपण समजू शकतो. पण बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांना ही टीका पचनी पडली नाही. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला निषेध नोंदवला. भारतीय समालोचकांनी प्रतिस्पर्धी संघापेक्षा स्वत:च्या संघाबाबत अधिक चांगले म्हणायला हवे, असा अमिताभ यांच्या ट्विटरचा अर्थ आहे. बच्चन हे एक अभिनेते म्हणून फार मोठे आहेतच, त्याबद्दल कोणाच्याही मनात किंतु असू नये. पण स्वत:च्या देशातील खेळाडूंबद्दल बोलायचे आणि तेही चांगले खेळत नसताना, याला नि:पक्षपाती म्हणता येईल का? ही अपेक्षा तुम्ही क्रिकेटच्या चाहत्याकडूनही करू शकत नाही, तर ती समालोचकाकडून कशी करू शकता. हर्षां क्रिकेटच्या बऱ्याच सामन्यांचे साक्षीदार आहेत. त्यांच्या या अनुभवाच्या जोरावर ते समालोचन करत असतात, त्यांच्या बोलण्यात काहीच चुकीचे नव्हते. कारण ते जर चुकीचे असते तर समाजमाध्यमांवर त्याचे पडसाद उमटलेच असते. पण तसे झाले नाही. बच्चन यांना त्यांचे समालोचन आवडले नाही, म्हणून भोगले वाईट समालोचन करतात, असा त्याचा अर्थ होतो का? जर होत नसेल तर बीसीसीआयने त्यांना काढण्याचे कारण काय? याचा अर्थ अमिताभ यांचे एक ट्वीट भोगले यांच्या समालोचनापेक्षा मोठे ठरले. का ते मोठे ठरवण्यात बीसीसीआयने धन्यता मानली, हेच कोणास कळत नाही. काही तज्ज्ञांच्या मते बच्चन यांचे ट्वीट हे एक फक्त निमित्तमात्र आहे. मूळ कारण हे भोगले यांच्या स्वभावात किंवा वागण्यात दडले असावे, असे काही जण म्हणताना दिसतात. नागपुरातील सामन्याच्या वेळी हर्षां यांच्याकडून असा काही एक प्रकार घडला, जो त्यांच्या नावारूपाला साजेसा नव्हता. पण त्यावरून त्यांना काढण्याचे पाऊल उचलता येऊ शकत नव्हते. बच्चन यांचे ट्वीट हे निमित्तमात्र ठरले, असे काही जण खासगीत म्हणतात. खरे-खोटे बीसीसीआय आणि त्यांचे अध्यक्ष जाणोत. जर या सांगोवांगी प्रकरणात भोगले यांची चूक असेलच, तर त्यांना शासन करायला हवे, त्याचा राग त्यांच्या समालोचनावर काढण्यात काय हंशील. कारण प्रत्येकाचे काम ठरलेले असते, तो त्याच्या कामामध्ये किती निपुण आहे, यावरून तो एक व्यावसायिक म्हणून कसा आहे, हे ठरत असते. एक व्यावसायिक समालोचक म्हणून हर्षां यांनी आतापर्यंत चांगलेच नाव कमावले आहे. चाहत्यांना त्यांचा आवाज ऐकल्याशिवाय चैन पडत नाही. त्याचबरोबर ते मेहनती आहेत, ठरवलेली कामे चोख बजावणारे आहेत, मग त्यांची गच्छंती का? याबाबत बीसीसीआय कोणतेही कारण देताना दिसत नाही. जर अमिताभ यांच्या ट्विटरवरून निर्णय व्हायला लागले तर एवढय़ा धुरीणांची बीसीसीआयमध्ये गरज ती काय? एखादा प्रकार घडल्यास किंवा अडचण आल्यास बच्चन हे बीसीसीआयचे निर्णय घेतील, असे मानून चालायचे का?  एखादा निर्णय घेताना त्याबद्दलची कारणमीमांसा बीसीसीआय करताना दिसत नाही. त्यांचा बेमुर्वतखोरपणा साऱ्यांनाच ठाऊक आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये त्यामध्ये भरच पडताना दिसत आहे. हर्षां यांनी बरीच वर्षे बीसीसीआयची सेवा केली, पण त्यांनाही याबाबतची कारणमीमांसा बीसीसीआयने केली नाही. त्यांना बीसीसीआयने आपल्याला करारमुक्त केल्याचे तिसऱ्याच व्यक्तीकडून समजले. हा करार संपवण्यात बीसीसीआयने पुढाकार घेतला की आयपीएलचे काम पाहणाऱ्या आयएमजी या रिलायन्सच्या कंपनीने, हेदेखील समजत नाही. पण बीसीसीआयच्या परवानगीशिवाय हे होऊ शकत नाही, हे मात्र तेवढेच खरे.

हर्षां यांची कारकीर्द फुलून चांगली बहरत होती. या प्रवासात बऱ्याच ऐतिहासिक क्षणांचे ते फक्त साक्षीदार झाले नाहीत तर श्रोत्यांनाही त्या क्षणांमध्ये सामावून घेतले. ती ताकद त्यांच्या समालोचनामध्ये होती. पण त्यांचा हा प्रवास बीसीसीआयने रोखला, तो का रोखला, हे अनाकलनीय आहे. राजकारणात त्यांचा नाहक बळी गेला, अशीच भावना सध्याच्या घडीला चाहत्यांमध्ये आहे. आता बीसीसीआयच्या सामन्यांमध्ये हर्षां यांचे समालोचन ऐकता येणार नाही, ही बाब खेदजनकच. त्यामुळे त्यांचे चाहते हिरमुसले असतीलही, पण ते नक्कीच आंतरराष्ट्रीय सामन्यांचे समालोचन करताना आपल्याला दिसतील, अशी आशा करू या.
प्रसाद लाड – response.lokprabha@expressindia.com