भारताचा मध्यमगती गोलंदाज झहीर खान याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी गुरूवारी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली. गेली अनेक वर्षे झहीर खानने भारतीय संघाच्या गोलंदाजीची धुरा समर्थपणे सांभाळली होती. झहीरने आजवरच्या कारकिर्दीत भारताकडून ९२ कसोटी सामने खेळले असून ३२.९४ च्या सरासरीने ३११ बळी मिळवले आहेत. तर २०० एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने २८२ बळी मिळवले आहेत.
२०११ साली भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देण्यात झहीर खानचा मोलाचा वाटा होता. मात्र, गेल्या काही दिवसांतील सततच्या दुखापती आणि तंदरुस्तीअभावी झहीरला भारतीय संघात पुनरागमन करण्यात अपयश येत होते. त्यामुळेच झहीरने निवृत्तीचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. झहीर फेब्रुवारी २०१४ मध्ये वेलिंग्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाकडून अखेरचा सामना खेळला होता.