|| सुकन्या ओळकर

प्रत्येक देशाची स्वत:ची खाद्यसंस्कृती असते.  बहुतांश वेळा सभोवतालचे वातावरण, हवामान, राहणीमान यातून ती घडत जाते. पाश्चिमात्य देशांमधे सॉसेज आवाडीने खाल्ले जाते. डुकराचे मांस किंवा गोमांसाचा खिमा त्या प्राण्यांच्या आतडय़ाच्या त्वचेत भरून, त्याला नळीचा आकार दिला जातो. काही सॉसेज भाजून, काही तळून तर काही उकडूनदेखील खातात.

दक्षिण जर्मनीमधील बव्हेरियन प्रांतात ‘वाईसवुर्स्ट’ अथवा पांढरे सॉसेज ही त्यातलीच एक प्रचलित पद्धत आहे. १८५७ साली ‘सेप मोसर’ नावाच्या खाटिकाने अपघाताने तयार केलेला हा पदार्थ आज बव्हेरियन खाद्यसंस्कृतीचा एक मुख्य घटक ठरला आहे. या खाटिकाला हे सॉसेज तळायचे होते. पण प्राण्यांची जाड त्वचा उपलब्ध नसल्याने पातळ त्वचा वापरली आणि ते सॉसेज फुटू नये म्हणून उकडले. हा नवीन प्रकार लोकांना आवडला.

मांसाबरोबरच यामध्ये चवीनुसार लिंबू, आलं, कांदा, दालचिनी, जायफळ असे काही मसाल्याचे पदार्थ भरतात. चवीनुसार मीठ वापरले जाते. दहा मिनिटे सॉसेज पाण्यात शिजवून घेतात. त्यामुळे ते पांढरे दिसतात. प्रेटत्झेल आणि मोहरीच्या गोड सॉसबरोबर ताजे वाईसवुर्स्ट खाल्ले जाते. हे खायच्या दोन-तीन पद्धती आहेत. सर्व पद्धतींमध्ये आधी वरील त्वचा सोलली जाते. केळ्यासारखे किंवा बारीक तुकडे करून, काटय़ा-चमच्याने सॉसेज बाहेर काढून हे खातात. प्रेटत्झेल आणि सॉसबरोबर वाईस बीअर म्हणजेच पांढरी बीअर, (गव्हाची बीअर) सुद्धा देतात. न्याहारी व दुपारच्या जेवणात वाईसवुर्स्ट खाण्याची पद्धत आहे.