ओंकार वर्तले

मावळ परिसरात पडणारा पाऊस आणि त्यानंतर कोसळू लागणारे धबधबे हे दरवर्षी अनुभवायलाच हवेत, असे असतात. डोंगरकडय़ावरून कोसळणारे हे जलप्रपात कोणालाही सहज मोहात पाडतात. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असे अनेक अवाढव्य धबधबे आहेत. पावसाळ्यात त्यांना भेट द्यायलाच हवी.

समर्थ रामदासांनीही शिवथरघळी समोरून पडणाऱ्या धबधब्याचे अतिशय यथार्थ वर्णन केले आहे.

गिरीचे मस्तकी गंगा तेथुनि चालली बळे

धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे

समर्थानी केलेल्या या वर्णनात मावळातील जवळपास सर्वच धबधबे अगदी चपखल बसतात. पुणे आणि मुंबईतूनच नव्हे तर संपूर्ण राज्यातून पर्यटक मावळ तालुक्यातील धबधब्यांखाली भिजण्यासाठी येतात. इतिहास आणि निसर्ग यांचा सुरेख संगम असलेल्या या तालुक्यात जाण्या-येण्याच्या सोयीसुद्धा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. मावळचे हे आडवाटेवरचे पावसाळी पर्यटन खासच ठरते. गर्दीपासून अलीप्त राहण्याची संधी देखील तिथे मिळते.

हे लक्षात ठेवा

धबधब्यात भिजणेच सध्या धोकादायक होत चालले आहे. कारण या प्रकारच्या भटकंतीला अरसिकतेचा विळखा पडला आहे. अशा रम्य, शांत आणि स्वच्छ ठिकाणी जाऊन मद्यपान करणे, उच्चरवात गाणी लावून शांततेचा भंग करणे, कचरा तिथेच टाकून येणे हे प्रकार टाळावेत. ते ठिकाण आपण येण्यापूर्वी जसे होते, तसेच कायम राहील, याची काळजी घ्यावी. विनाकारण धाडस करू नये. भिजताना सुरक्षिततेचा विचार आधी करावा. छायाचित्रे टिपण्यासाठी, आगळ्यावेगळ्या सेल्फीसाठी जीव धोक्यात घालू नये. वेगाने कोसळणारा शुभ्र जलप्रपात पाहणेही भिजण्याएवढेच आनंददायी ठरते. त्यामुळे धबधब्याखाली भिजण्याचा अट्टहास करू नये. आपली भटकंती स्थानिकांना अजिबात त्रासदायक ठरणार नाही, याची काळजी घ्यावी.

परिटेवाडीचा धबधबा

खरे तर हे गावही अनेकांना माहीत नाही. नकाशावर शोधतानाही आपली दमछाक होईल. पण भूगोलाच्या चष्म्याने जर या गावाकडे पाहिले तर तुम्हालाही हेवा वाटेल. पाण्याने तुडुंब भरलेली भातखाचरे, ओलेचिंब वळणावळणांचे रस्ते, आसमंतात पसरलेले धुके हे सारे अनुभवण्यासाठी एकदा तरी परिटेवाडीला भेट द्यावी लागेल. पुणे-मुंबई महामार्गाजवळील तळेगाव एमआयडीसीवरून निगडीमार्गे परिटेवाडीला यायचे. गावातच डोंगराच्या कुशीत असलेला हा धबधबा डोळ्यांचे पारणेच फेडतो. धबधब्याकडे जाणारी वाट मात्र अजिबात मळलेली नाही. त्यामुळे तिथे स्थानिकांना विचारात शेताच्या बांधांवरून जावे लागते. आपण साधारण अर्ध्या तासात डोंगरकडय़ाच्या खाली येतो. तीनशे फूट उंचीवरून कोसळणारा हा जलप्रपात अक्षरश: दडपणच आणतो.

दुधीवरेचा जोडधबधबा

दुधीवरे हे पवनमावळातले आणि पवनाकाठचे गाव. या गावाच्या डोक्यावरच लोहगड आणि समोर धरणाचे विशाल पात्र आहे. अशा निसर्गचित्राप्रमाणे दिसणाऱ्या या गावात डोंगराच्या कुशीत दोन जुळे धबधबे आहेत. धबधब्याकडे जाण्यासाठी गावातच गाडय़ा लावाव्या लागतात आणि १५ मिनिटांतच तिथे पोहोचता येते. सहकुटुंब भिजण्यासारखा हा नितांत सुंदर धबधबा आवर्जून पाहावा.

कातळधार

हा धबधबा आडवाटेवरचा आहे. जणू काही अस्सल रसिकांची वाट पाहात असलेल्याप्रमाणे तो भासतो. हा धबधबा प्रसिद्ध राजमाची किल्लय़ाजवळ आहे. इतर धबधब्यांच्या तुलनेत कातळधारेचे सौंदर्य अद्याप शाबूत आहे. याचे कारण म्हणजे येथे जाण्यासाठी मुख्य रस्त्यापासून करावी लागणारी तासाभराची तंगडतोड. त्यामुळे अस्सल भटकेच इथवर पोहोचतात. इथे येण्यासाठी लोणावळ्याहून राजमाचीचा रस्ता पकडावा लागतो. या रस्त्यावरील डेला हे ठिकाण सोडून तीन-चार किलोमीटर पुढे गेलो की या रस्त्यालाच अप्पर डेकचा रस्ता मिळालेला दिसतो. तिथून थोडे पुढे गेलो की एक आढय़ाचे झाड आणि याच्याच पुढे भलामोठा गोल दगड पडलेला आहे. कातळधारेसाठी हीच महत्त्वाची खूण लक्षात ठेवावी. तिथूनच मुख्य वाट सोडून डाव्या बाजूला वळायचे. तिथून सुरू होतो धबधब्यापर्यंत पोहोचवणारा प्रवास.

ovartale@gmail.com