राजेंद्र श्रीकृष्ण भट

सोसायटीच्या आवारात वृक्षारोपण केले जाते तेव्हा देखणी आणि उपयुक्त झाडे लावणे गरजेचे आहे. अशा देखण्या वृक्षांमध्ये अग्रक्रम लागतो तो बहावा आणि ताम्हण यांचा. हे दोन्ही वृक्ष ठेंगणे आहेत, मात्र त्यांचा बहराचा काळ हा अतिशय नेत्रसुखद अनुभव देणारा ठरतो.

बहावा : या वृक्षाला हिंदीत अमलताश म्हणतात. संस्कृत वाङ्मयातही याचा उल्लेख जागोजागी आढळतो. अतिशय सुंदर फुले येणाऱ्या मोजक्याच भारतीय वृक्षांच्या यादीत याचा क्रमांक लागतो. हा ‘सुवर्णवृक्ष’ हिमालयात १२०० मीटर उंचीपासून कन्याकुमारीच्या समुद्रसपाटीपर्यंत सर्वत्र आढळतो. आसाम-मेघालयाच्या घनदाट पर्जन्यवनांपासून कच्छ-राजस्थानच्या वाळवंटांपर्यंत सर्वत्र ही पिवळीधमक फुले दिसतात. हा अस्सल भारतीय वृक्ष अनेकांनी आपापल्या देशांत नेला. लहान ते मध्यम आकाराच्या पानगळ वृक्षांत याचा समावेश होतो. याच्या फांद्या अस्ताव्यस्त वाढलेल्या असतात आणि खोड गुळगुळीत पिवळसर काळ्या रंगाचे असते.

पावसाआधी याची सर्व पाने गळतात आणि पिवळ्या फुलांचे सुंदर घोस लगडतात. द्राक्षांच्या घडासारखे हे घोस डोळ्यांचे पारणे फेडतात. त्यांचे सौंदर्य केवळ अवर्णनीय असते. नवी लालसर पालवी फुटत असते. असंख्य कळ्या-फुलांच्या माळा लोंबणारा या वृक्ष विलोभनीय दिसतो. याची फुले सुवासिक असतात. घोसाच्या देठाकडून टोकाकडे अशी ती उमलत जातात. बहाव्याचे औषधी गुणधर्म पुढील भागात जाणून घेऊ.