राजेंद्र श्रीकृष्ण भट

गच्चीवर जिथे भरपूर उजेड येतो, अशा जागेत अनेक प्रकारच्या फळभाज्यांची लागवड सहज करता येते. टोमॅटो, वांगी, मिरची, कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, नवलकोल इत्यादी भाज्यांचे उत्पादन घेता येते. या वर्गातील सर्व भाज्यांची आधी रोपे करावी लागतात. तीन ते चार आठवडय़ांत रोपे पुर्नलागवडीसाठी योग्य होतात. रोपे लावण्यासाठी कमी उंचीची, पसरट कुंडी घ्यावी. एखाद्या ट्रेमध्ये रोपे करता येतात. काही ठिकाणी रोपे विकतही मिळतात.

रोपे करण्याची पद्धत

ज्या मातीत रोपे लावायची आहेत ती माती उन्हात ठेऊन पूर्णपणे वाळवून घ्यावी. त्यामुळे त्यातील हानीकारक बुरशीचा नाश होतो. मातीत तिच्या निम्मे शेणखत, गांडुळ खत किंवा कंपोस्ट मिसळावे. शक्यतो सुधारित किंवा संशोधित बियाणे आणावे. संकरित बियाण्याची अन्नाची मागणी मोठी असते. बियाणे उन्हात अर्धा दिवस वाळवावे. बियाण्याच्या पाकिटावर त्याची उगवण क्षमता नमूद केलेली असते. ७० टक्के लिहिले असेल, तर आपल्या आवश्यकतेपेक्षा ३० टक्के बियाणे अधिक घ्यावे. कोबी, ब्रोकोली, फ्लॉवरचे बियाणे १५-२० दिवसांच्या अंतराने पेरावे. या फळभाज्या मिळवण्यासाठी पूर्ण झाडच उपटून काढावे लागते. याउलट वांगी एक-दोन वर्षे, मिरची सात-आठ महिने ते एक वर्ष, टोमॅटो तीन-चार वर्षे उत्पादन देतात. नवलकोल पूर्ण काढावा लागतो. त्यामुळे त्याचे बीसुद्धा १५-२० दिवसांनी पेरावे.

बियाणे पेरताना त्याच्या जाडीपेक्षा तीन-चार पट खोल पेरावे. जास्त खोल पेरल्यास उगवण कमी होते. जास्त वर पेरल्यास रोपे कोलमडून पडतात.