हत्ती त्यांच्या सुळ्यांसाठी नेहमीच शिकाऱ्यांचे लक्ष्य होतात. कायदे करूनही हस्तिदंतांची तस्करी थांबलेली नाही आणि त्यामुळे हत्तींची शिकारही सुरूच आहे. मोठय़ा हत्तींची शिकार झाल्यावर लहान हत्ती अनाथ होतात. बऱ्याचदा हत्तींच्या कळपावर हल्ला झाल्यास कळप विखुरतो आणि लहान पिल्ले कळपापासून वेगळी होतात. तिसरे कारण म्हणजे आफ्रिकेत दुष्काळ तर पाचवीला पुजलेला आहे. या दुष्काळात उपासमारीने हत्तीणींचा मृत्यू होतो आणि पिल्ले अनाथ होतात. अशा पिल्लांसाठी नैरोबी येथे एक अनाथालय स्थापन करण्यात आले आहे.

हत्तींच्या अनाथ पिल्लांना जंगलात परत जाऊन नैसर्गिक जीवन जगण्याची संधी मिळावी यासाठी १९७७ मध्ये डॉ. डेन शेड्रिक हिने आपल्या पतीच्या नावाने ‘डेविड शेड्रिक वाईल्ड लाइफ ट्रस्ट’ची (डीएसडब्ल्यूटी) स्थापना केली. या ट्रस्ट अंतर्गत त्यांनी जखमी, कळपापासून वेगळ्या झालेल्या हत्तींचे आणि पाणघोडय़ांचे संरक्षण केले. त्यांना हक्काचे घर मिळवून दिले आणि नैसर्गिक वातावरणात वाढवून जंगलात सोडण्यात आले. ट्रस्टच्या स्थापनेपासून आजपर्यंत अशा प्रकारे १५० हत्तींना मुक्त करण्यात आले आहे.

नैरोबी ही केनियाची राजधानी आहे. या शहरात मध्यवर्ती ठिकाणी डीएसडब्ल्यूटीचे हत्ती अनाथालय आहे. रोज सकाळी ११ ते १२ या वेळात येथे अनाथ हत्तींच्या पिल्लांची पर्यटकांशी भेट घडवून देण्यात येते. जगभरातील पर्यटकांची रोज इथे झुंबड उडते. एका मोकळ्या मैदानात सर्वाना आणले जाते. मैदानाच्या एका टोकाला एक छोटेसे तळे केलेले आहे. मैदानात ठरावीक अंतरावर पाण्याने भरलेले ड्रम आणि त्याच्या बाजूला झाडाच्या फांद्या  ठेवलेल्या  दिसतात. काही ठिकाणी मोकळी केलेली माती ठेवलेली असते. मैदानाच्या एका भागात अर्धगोल सुतळी बांधलेली असते. सुतळीच्या कडेने पर्यटक उभे राहिल्यावर जंगलातून एकामागोमाग एक हत्तींची पिल्ले दुडुदुडू धावत यायला लागतात. काही पिल्ले तर थेट प्रेक्षकांमध्ये घुसून दोरीतून आत झेपावतात. डीएसडब्ल्यूटीचे कार्यकर्ते हातात दुधाच्या बाटल्या घेऊन उभे असतात. ३ लिटरची एक दुधाची बाटली गटागटा प्यायल्यावर ती पिल्ले थोडीशी शांत होतात. मग दुसरी बाटली पिऊन झाल्यावर समोर ठेवलेल्या डहाळ्या तोंडात धरून चघळायला लागतात, कोणी अंगावर माती उडवते, तर कोणी असेच फिरत राहते. ड्रममधल्या पाण्याशी खेळणे या पिल्लांना फारच आवडते. कधी कधी तर त्यांची मस्ती एवढी वाढते की ते पाण्याचे ड्रम पाडून टाकतात.

एखादा कार्यकर्ता हत्तींच्या पिल्लांची माहिती सांगतो. सध्या त्यांच्याकडे १९ पिल्ले आहेत. ३ महिने ते २.५ वर्षांच्या ९ हत्तींचा एक गट आणि अडीच वर्षांवरील ९ हत्तींचा एक गट केलेला असतो. आम्ही गेलो तेव्हा एक ६ महिन्यांचे पिल्लू मात्र त्यांच्यात नव्हते. कारण शिकाऱ्यांनी कदाचित दुसऱ्या सावजासाठी मारलेली गोळी हत्तीच्या पिल्लाच्या पायाला लागून ते कायमचे जायबंदी झाले होते. आमच्यासमोर असलेल्या एका अडीच वर्षांच्या हत्तीणीची सोंड सापळ्यात अडकून जवळ जवळ तुटलेलीच होती. त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया केल्यावर आज ती हत्तीण तिचे नैसर्गिक जीवन जगू शकत होती.

काही पिल्लांचे पालक उपासमारीने मेले होते. काही कळपापासून वेगळी होऊन जंगलात एकटी फिरताना किंवा गावात सापडली होती. आदिवासी लोकांमध्ये आणि जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या गावांमध्ये हत्तींबद्दल जनजागृती केल्यामुळे अशा हत्तींच्या पिल्लांची माहिती ट्रस्टला मिळते आणि ते त्या पिल्लांची सुटका करून त्यांची त्यांच्या नैसर्गिक अधिवासात काळजी घेतात. योग्य वयात आल्यावर त्यांना कळपाने जंगलात सोडतात. त्यानंतरही त्यांचा माग ठेवला जातो.

पहिल्या गटातील हत्ती गेल्यावर दुसऱ्या गटातील हत्ती येतात. हे मोठे असल्याने अनेकांना सुळे फुटलेले असतात. धसमुसळेपणाने दूध पिऊन झाल्यावर ते आधीच्या हत्तींसारखे आपापल्या उद्योगांत रममाण होतात. एवढय़ा सुंदर निरागस प्राण्यांची हस्तीदंतासाठी शिकार कशी करावीशी वाटते, हा प्रश्न तिथे जमलेल्या सर्वाना पडतो. हेच ही भेट घडवण्यामागचे ट्रस्टचे उद्दिष्ट असते.

मसाई मारा पाहण्यासाठी बरेच जण हल्ली केनियात जातात. तेव्हा नैरोबीत एक दिवस मुक्काम करावा लागतो. त्या मुक्कामात हत्तींचे अनाथालय आणि जिराफांसाठी काम करणारे जिराफ सेंटर यांना आवर्जून भेट द्यावी. अध्र्या दिवसात दोन्ही ठिकाणे पाहून होतात.

हत्तींचे पालकत्व

एका हत्तीच्या पिल्लाचा पालनपोषणाचा खर्च ९०० डॉलर आहे. ते देणाऱ्यास त्या हत्तीच्या पिल्लाचे पालकत्व दिले जाते. त्याच्या नावाने हत्तीचे बर्थ सर्टििफकेट बनवतात. वर्षांतून एक-दोनदा त्यांना आपल्या पाल्याला भेटता येते. वर्षभराची प्रगती तसेच जंगलात सोडल्यानंतरही हत्तीची माहिती पालकांना दिली जाते.

amitssam9@gmail.com