News Flash

क्रोएशियातील  झऱ्यांची उतरंड

झाग्रेब हे शहर आजही मध्ययुगीन काळाच्या अनेक खाणाखुणा अंगावर मिरवत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

विजय दिवाण

युरोपातील पर्यटन म्हटले की नेहमी पश्चिम युरोपातल्या देशांचीच नावे आठवतात. फ्रान्स, इटली, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्स, स्वित्र्झलड, ऑस्ट्रिया पाहण्यास बरेच पर्यटक प्राधान्य देतात, पण प्रत्यक्षात युरोप खंड याहून बराच मोठा आहे आणि त्यात पाहण्यासारखेही बरेच काही आहे. आज आल्प्स पर्वतरांगांत दडलेल्या ‘प्लिटव्हाइस् लेक्स् नॅशनल पार्क’मधील धबधब्यांची उतरंड पाहूया..

क्रोएशिया, स्लोव्हेनिया, हंगेरी अशा देशांत जाणाऱ्या पर्यटकांच्या मनात, इथे पश्चिम युरोपपेक्षा वेगळे असे काय पाहायला मिळणार, असा प्रश्न हमखास येतो. क्रोएशिया पाहायचा असेल, तर मुंबईहून कतारला जावे, तिथून दोहा शहरामार्गे क्रोएशियातील झाग्रेबला पोहोचावे. झाग्रेब हे क्रोएशियाचे राजधानीचे शहर होय. युरोपातील आल्प्स् पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या या शहरात पाय ठेवल्याबरोबर तिथला देखणा विमानतळ, बाहेर रस्त्यांवर डौलाने फिरणाऱ्या निळ्या ट्रामगाडय़ा, चौकाचौकांत फुललेले रंगीबेरंगी फुलांचे ताटवे आणि जागोजागी उभारलेले सुंदर पुतळे लक्ष वेधून घेतात आणि प्रवासाचा सगळा शीण नाहीसा होतो.

झाग्रेब हे शहर आजही मध्ययुगीन काळाच्या अनेक खाणाखुणा अंगावर मिरवत आहे. तिथे जुन्या बॅरॉक शैलीत बांधलेले सेंट कॅथेरीन चर्च, रंगीबेरंगी कौलांचे सेंट मेरीचे चर्च, ‘सॅबॉर’ या नावाने ओळखले जाणारे तिथले पार्लमेंट हाऊस, क्रोएशियाच्या स्वातंत्र्याचा प्रणेता बान जेलासिक याचा अश्वारूढ पुतळा अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. तिथले प्लिटव्हाइस् लेक्स नॅशनल पार्क पाहावे. हे ठिकाण फारच आगळेवेगळे आहे. क्रोएशियात मध्यस्थानी आल्प्स् पर्वतरांगा आहेत. त्यांची उंची साधारण ५००० फूट आहे. हे पर्वत आणि त्यांच्या भोवतीची सारी जमीन ही चुनखडीचे खडक, डोलोमाइटचे दगड आणि जिप्समने भरलेली आहे. तिथे सतत पाऊस पडतो आणि त्याचे पाणी त्या जमिनीत मुरते. सततच्या पावसामुळे खडकांचे पृष्ठभाग विरघळून त्यात मोठे खड्डे तयार होतात. त्या डोंगरांच्या उतारांवर टप्प्याटप्प्यांवर अनेक ठिकाणी खोलगट खडकाळ भागांत पाणी साचून तळी तयार झाली आहेत. ही तळी चुनखडीच्या नैसर्गिक बांधांमुळे त्या त्या टप्प्यापुरती मर्यादित आहेत. पाऊस पडला की डोंगरांत अनेक छोटे ओढे-नाले वाहू लागतात. खडकांमधल्या भेगांतून, डोंगर-उतारांवरच्या शेवाळातून पाणी वाहू लागते. ठिकठिकाणचे ओहोळ आणि छोटय़ा नद्या असे सारे प्रवाह वाहत येऊन टप्प्या-टप्प्यांवरच्या तळ्यांत पाणी भरते. वरच्या बाजूची सगळी तळी पाण्याने भरली की त्यांतले पाणी धबधब्यांच्या रूपात खालच्या तळ्यांत पडू लागते आणि मग त्या खालच्या साऱ्या तळ्यांतले पाणी नवनव्या धबधब्यांचे रूप घेऊन त्यांच्याही खालच्या तळ्यांत वाहू लागते.

अशा तऱ्हेने या डोंगरांत वरपासून खालपर्यंत टप्प्या-टप्प्यांवर अनेक तळी आहेत. त्या तळ्यांतील पाणी क्रमाक्रमाने वेगवेगळ्या धबधब्यांतून खाली पडत असते. डोंगरांच्या उतारावर वरपासून खालपर्यंत निर्माण झालेली ही नैसर्गिक तळ्यांची आणि धबधब्यांची उतरंड म्हणजेच ‘प्लिटव्हाइस् लेक्स नॅशनल पार्क’. तळी आणि धबधब्यांची ही उतरंड पाहत तासन्तास भ्रमंती करणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो.

कोरोना नदी आणि पदभ्रमंती

या पाच हजार फूट उंच पर्वतावर साधारण दोन हजार फुटांपासून खाली १६०० फुटांपर्यंत टप्प्या-टप्प्यांवर अशी १६ तळी तयार झाली आहेत. या सर्व तळ्यांत साचलेल्या पाण्याची ‘कोराना’ नदी तयार झाली आहे. वरपासून खालपर्यंतचे हे अंतर सुमारे आठ किलोमीटर एवढे आहे. हे रम्य दृश्य जवळून पाहण्यासाठी हा आठ किलोमीटरचा उभा चढ चढून जावा लागतो. अनेक पर्यटक तो चढून जातात. शेवटी तर खूप दमछाकही होते, पण तरीही क्रोएशियातल्या या अनोख्या पर्वतांतली ‘माथा ते पायथा’ अशी सोळा तळ्यांची आणि धबधब्यांची उतरंड ‘याचि देही’ पाहणे हा आयुष्यभर पुरेल एवढा रम्य अनुभव असतो.

vijdiw@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 4:40 am

Web Title: article about freshwater cruises in croatia
Next Stories
1 दोन दिवस भटकंतीचे : पाली-सुधागड
2 खाद्यवारसा : काळीमिरी पराठा
3 शहरशेती : नैसर्गिक खते, कीटकनाशके