मकरंद जोशी

* हिमालयाच्या कुशीतील शिमला, मनाली, नैनिताल, मसुरी, धरमशाला, डलहौसी, खज्जियार, दार्जिलिंग, गंगटोक ही सर्व ठिकाणे वेगवेगळ्या उंचीवर वसलेली आहेत. त्यामुळे सगळीकडच्या तापमानात फरक असतो. अ‍ॅक्युवेदरसारख्या संकेतस्थळाच्या मदतीने तेथील तापमान जाणून घेता येईल.

* शिमला-मनालीला जाणार असला, तर राहण्यासाठी शिमल्याच्या ऐवजी जवळचे मशोर्बा, कुफ्री, सोलन, नारकंडा, फागु अशा ठिकाणच्या हॉटेलची निवड करावी. शिमल्याच्या गर्दीपासून दूर राहता येईल.

* एप्रिल-मेमध्ये थेट बर्फात जायची हौस मनालीत रोहतांग पास परिसरात भागवता येते. मात्र तिथे जाताना भाडय़ावर मिळणारे हातमोजे, मोठे बूट, गरम कोट अवश्य घ्या, तरच बर्फाचा आनंद लुटता येईल.

* नैनिताल, शिमला, दार्जिलिंग येथील हॉटेल्स उंचावर असतात आणि तिथे उद्वाहनही नसते, त्यामुळे सामान आटोपशीर ठेवा.

* या सर्व ठिकाणी कोरडे खाद्यपदार्थ सहज मिळतात. त्यामुळे आता टिकाऊ  पदार्थ बाळगण्याची गरज नसते.

* या परिसरात पुरातन मंदिरे आणि बुद्धविहार आहेत. तिथे छायाचित्रणापूर्वी परवानगी घ्यावी. आपल्या वर्तनाने पावित्र्यभंग होणार नाही याची खबरदारी घ्यावी. स्थानिकांची आणि त्यांच्या घरांची छायाचित्रे टिपण्यापूर्वीही परवानगी घ्यायला विसरू नका.

* थंड हवेच्या प्रदेशात काही वेळा थंडीमुळे बॅटरी चालत नाही. तसेच वीजपुरवठाही वारंवार खंडित होतो. त्यामुळे कॅमेरासाठी जादा बॅटरी सोबत ठेवाव्यात.

* नैनिताल, दार्जिलिंगमध्ये प्लास्टिकबंदी काटेकोर पाळली जाते. बंदीचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी.