राजेंद्र श्रीकृष्ण भट

आवळा

अापल्याकडे परंपरा असे मानते की, कवठ, आवळा आणि बेल ही झाडे जो दारात लावेल, त्याला नरक दिसणार नाही. आवळा हा एक नावाजलेला औषधी वृक्ष आहे. तो वन ट्री फार्मसी म्हणून प्रसिद्ध आहे. अति पावसाचा आणि वाळवंटी प्रदेश सोडून आवळ्याची लागवड कुठेही करता येते. हा छोटा किंवा मध्यम आकाराचा बहुगुणी वृक्ष आहे. त्याचे औषधी उपयोग तर आहेतच, शिवाय त्याचे लाकूड इंधन म्हणूनही वापरले जाते.

आवळ्याच्या लाकडाचे किंवा फांद्यांचे तुकडे गढूळ पाण्यात टाकल्यास पाणी स्वच्छ होते. पाला गुरांसाठी चारा म्हणून किंवा खत म्हणून वापरतात. आवळ्याच्या फळात ‘क’ जीवनसत्त्व सर्वाधिक प्रमाणात असते. फळ वाळवले किंवा तापवले तरी ते नष्ट होत नाही. च्यवनप्राश आणि त्रिफळा तयार करताना आवळ्याचा वापर केला जातो. आवळ्याचे विविध प्रकार आहेत. त्याची कलमे मिळतात. शक्यतो दोन वेगवेगळ्या जातींची कलमे लावावीत. शक्यतो या झाडाला कीड, रोग लागत नाही. हिवाळ्यात पानगळ होते.

कोकम

अति उष्ण आणि कोरडय़ा वातावरणात हे झाड वाढत नाही. सह्य़ाद्रीच्या दोन्ही बाजूंना हे झाड वाढते. वाढ संथ आणि सरळ उभी असते. सहा ते बारा मीटर उंच वाढते. लोंबकळणाऱ्या फांद्यांचे हे झाड कायम हिरवेगार असते. याला आठ-नऊ वर्षांनी फळे लागण्यास सुरुवात होते. हिवाळ्यात बहर येतो. साधारण डिसेंबरच्या मध्यावर पानांच्या बगलेत अतिशय छोटी फुले येऊ लागतात. कोवळी पाने आंबट असतात. फळे कच्ची अथवा पिकलेली खातात. बियांचे तेल औषधी असते. हिवाळ्यामुळे टाचांना भेगा पडत असल्यास कोकम तेल लावतात.