29 September 2020

News Flash

पुरुषी अहंकार जावा..

दैनंदिन जीवनात अगदी सहजतेने विविध भूमिका पार पाडत महिला समाजाच्या आधारस्तंभ बनल्या आहेत.

|| देवेश गोंडाणे

महिला दिनी विविध उपक्रम, सक्षमीकरणावरील चर्चासत्रे, विविध दुकानांतून आकर्षक सवलतींचे फलक वगैरे सारे उत्सव सुरू होतात. पण महिला दिनाचे महत्त्व पुरुषांच्या नजरेतून कसे आहे? त्याविषयी..

दैनंदिन जीवनात अगदी सहजतेने विविध भूमिका पार पाडत महिला समाजाच्या आधारस्तंभ बनल्या आहेत. कधी प्रेमळ कन्या, तर कधी वात्सल्यपूर्ण माता, तर कधी सक्षम सहचारिणी अशी विविध नाती अत्यंत कुशलतेने आणि कोमलतेने त्या निभावत आहेत. असे असले तरी बऱ्याच ठिकाणी समाजाकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. तसेच महिला मोठय़ा प्रमाणात सामाजिक असमानता, अत्याचार, आर्थिक परावलंबित्व आणि अन्य सामाजिक अत्याचारांना बळी पडतात. अनादी काळापासून महिलांवरील ही बंधने त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाच्या आड येत आहेत. महिलांना पुरुषांच्या तुलनेत समान स्तरावर आणण्यासाठी सबलीकरणाची नवीन संरक्षक शक्ती व सामर्थ देणे गरजेचे आहे. राजकीय स्तरावर निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढल्यास राजकारणात बदल होईल. तसेच राजकारणाला नवी दृष्टी मिळेल आणि राजकारणात संस्थात्मक बदलदेखील घडतील. शिक्षणाचा अभाव राजकारणाकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन, महिलांची कुटुंबाप्रती असणारी जबाबदारी व परंपरेमुळे तसेच मानसशास्त्रीयदृष्टय़ा स्त्री राजकारणापासून उदासीन राहते. या व अशा अनेक बाबी स्त्रियांच्या राजकीय सहभागातील कमी प्रमाणास कारणीभूत ठरतात. महिलांना सक्षम करूनच आपण समाज आणि राष्ट्राला बलवान करू शकतो. महिलांचा सहभाग, त्यांना संरक्षण, त्यांची आर्थिक उन्नती, त्यांच्या क्षमतांचे संवर्धन आणि या सर्वांसाठी अनुकूल वातावरण निर्मिती करावी लागणार आहे. स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणे आवश्यक आहे. २१ व्या शतकातील आधुनिक समाजाने स्त्रियांकडे निखळ दृष्टीने पहायला हवे असा समाज घडविणे ही पुरुष व स्त्री दोघांची जबाबदारी आहे. समाजाने आपली मानसिकता बदलून स्त्रियांना जगवले पाहिजे तरच ती शिक्षित होऊ शकेल तसेच त्या माध्यमातून विकसित राष्ट तयार होईल, अशी भूमिका आजच्या तरुणाईने मांडली आहे. त्यामुळे केवळ महिला दिन साजरा न करता महिलांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण करण्यासाठी पुरुषी मानसिकता दूर सारता आली पाहिजे.

पुरुषी अहंकार दूर होणे गरजेचे

महिलांना कायम दुय्यम वागणूक देण्यामागे सर्वात मोठा कारणीभूत असतो तो पुरुषांचा अहंकार. कार्यालये, शिक्षणक्षेत्र किंवा कुठल्याही ठिकाणी महिलांसोबत काम करत असताना त्यांना समानतेची वागणूक देण्यासाठी तो कारणीभूत ठरीत असतो. या पुरुषी अहंकारामुळेच अनेकदा महिलांना अपमानाची वागणूक दिली जाते. हे बदलविण्यासाठी आम्हाला पुरुषांना आपली माणसिकता सक्षम करणे आवश्यक ठरणार आहे.      – वैभव बावनकर

महाविद्यालयात समान वागणूक हवी

उच्च शिक्षणात महिलांचे प्रमाण सध्या वाढताना दिसत आहे. हे अधिक वाढण्याची गरज आहे. यासाठी पुरुषांनी त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे. यासाठी महिलांना शिक्षण घेताना होणाऱ्या अडचणी सोडविण्याची जबाबदारी ही समाजाची आणि आमची आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. त्याशिवाय शिक्षणात स्त्रियांची टक्केवारी वाढविता येणार नाही. त्यासाठी शिक्षण घेणाऱ्या मुलींशी विद्यार्थी म्हणून स्पर्धा करणे ठीक आहे. मात्र, मुलगी आपल्या समोर कशी जाईल अशी भावना असेल तर ती चुकीचे आहे. – स्नेहल वाघमारे

घरात सन्मान देणे सुरू करा

आजच्या पिढीतील शहरात राहणाऱ्या मुलींनाही याची जाणीव नाहीय. महिला दिन हा वूमनहूड साजरा करण्यासाठी असतो की, स्त्री पुरुषापेक्षा वरचढ असते असे सिद्ध करण्याचा प्रयत्न असतो? वूमनहूडचे सेलिब्रेशन आणि पुरुष करतात तर मग आम्ही का नाही? म्हणून सगळ्याच बाबतीत कारण नसताना बरोबरी करणे या दोन वेगळ्या आणि दोन टोकाच्या गोष्टी आहेत. कोणत्या उद्देशाने आपण हा स्त्रीला एक व्यक्ती म्हणून घरातून सन्मान देण्याची जास्त गरज आहे. – प्रा. अनिल डहाके

नकाराचा स्वीकार करावा

हिंगणघाट येथील तरुणीची एकतर्फी प्रेमातून भर रस्त्यात एका तरुणाने पेट्रोलने जाळून हत्या केली. अशा घटना वरचेवर घडत असतात. प्रेमात समोरच्या व्यक्तीने दिलेला नकार हा त्या व्यक्तीचे स्वातंत्र्य आहे, हे मान्य करायला तरुण तयारच नसतात. यातून मुलांच्या अहंमला धक्का लागून मुलीने नकार दिला की, तिला संपवायचेच ही मानसिकता बनत चालली आहे. मुलीने  नकार ठाम शब्दात व्यक्त करणे हा तिचा अधिकार आहे. त्यामुळे ‘नो मिन्स नो’ हा विचार आणि स्वीकार मुलांनी व समाजाने करणे गरजेचे आहे. मुलीने नकार दिला की तिला संपवायचे ही तरुणांची विकृत मानसिकता मात्र बदललेली नाही. डॉ. प्रा. अमित झपाटे

वेगळया दिवसाची गरज काय?

मला स्वत:ला या डेची काही गरज आहे असे अजिबात वाटत नाही. फक्त त्याच दिवशी किंवा त्याआधी नंतर एकदोन दिवस यावर अखंड चर्चा होते. या चर्चेतून काहीच मिळत नाही. फक्त महिला पुरुषापेक्षा कशी पुढे आहे, पुरुष कसे महिलांसोबत चुकीचे वागतात, याशिवाय त्यातून काहीच बाहेर येत नाही. खरतर हा दिवस म्हणजे अजून एक हक्काचा दिवस आहे सेलिब्रेशनसाठी. महिलांना, मुलींना ऑफिशली पार्टी करता येते. या पलीकडे काहीच होत नाही. शाळा-कॉलेजमध्येही खास असे काही होत नाही. एकीकडे आपण पुरुष आणि स्त्री समान आहेत असे बोलतो आणि दुसरीकडे महिला दिवस मात्र सेलिब्रिट केला जातो. अशा वेगळ्या दिवसाची गरज आहे नाहीच, महिलांचा सन्मान हा प्रत्येकच दिवशी व्हायला हवा.

-प्रा. अमित तिसरे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2020 2:10 am

Web Title: article by devesh gondane importance of womens day akp 94
Next Stories
1 न्यूट्री पंच सलाड
2 न दिसणारे वास्तव
3 सहकारी संस्थांना ग्राहक न्यायालयाची दारे बंद?
Just Now!
X