भारतीय ग्राहकांना लक्ष्य करून स्वस्त किमतीतील स्मार्टफोन आणणाऱ्या कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. त्यात नामांकित कंपन्यांपेक्षा फारसे नाव नसलेल्या नवीन कंपन्यांमध्ये ‘दर्जेदार’ चुरस पाहायला मिळते. नामांकित कंपन्यांच्या दहा हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीत मिळणाऱ्या स्मार्टफोनसारखीच वैशिष्टय़े पुरवणारे आणि तरीही दहा हजार रुपयांपेक्षा कमी किमतीतील स्मार्टफोन बाजारात येतच आहेत. ‘आयटेल’ कंपनीचा ‘व्हिजन वन’ या पंक्तीत आघाडीवर बसू शकतो.

स्मार्टफोनचं विश्व जसंजसं ग्राहकांना भावत चाललं आहे, तसंतसं या बाजारपेठेच्या कक्षाही रुंदावत चालल्या आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत केवळ शहरी भागांतील ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून स्मार्टफोनची निर्मिती करणाऱ्या कंपन्या आता ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करू लागल्या आहेत. ग्रामीण भागातील ग्राहकांची क्रयक्षमता कमी असल्याने त्यांच्यासाठी कमी दरांतील स्मार्टफोन उपलब्ध करून देण्यास सर्वच कंपन्यांनी सुरुवात केली आहे. मात्र, त्याच वेळी या ग्राहकांमध्ये स्मार्टफोनमधील आधुनिक वैशिष्टय़ांबद्दल आकर्षण असल्याचेही विसरून चालत नाही. ‘टिकटॉक’ किंवा ‘यूटय़ूब’वरील व्हिडीओ पाहणाऱ्यांत तसेच व्हिडीओ बनवणाऱ्यांत निमशहरी आणि ग्रामीण भागांतील वापरकर्त्यांचे प्रमाण जास्त आहे. म्हणजेच, हे वापरकर्ते नवनवीन तंत्रज्ञानाला पटकन स्वीकारत असल्याचे दिसून येते. अर्थात नामांकित कंपन्या अशी वैशिष्टय़े असलेले स्मार्टफोन बाजारात कमी किमतीत आणत असल्या तरी, हे दर अजूनही सर्वसामान्य ग्राहकांसाठी चढेच आहेत. अशा वेळी नवनवीन कंपन्यांकडून तशाच प्रकारचे स्मार्टफोन कमी दरांत आणले जातात, तेव्हा त्यावर ग्राहकांच्या उडय़ा पडतात. त्यातून या कंपन्यांची ‘ब्रॅण्ड व्हॅल्यू’ही वधारते. ‘रेडमी’, ‘रिअलमी’ या कंपन्या याचे उत्तम उदाहरण आहे. ‘आयटेल’ या ब्रॅण्डसोबत ‘ट्रान्शन’ या कंपनीनेही निम्नउत्पन्न श्रेणीतील ग्राहकांना केंद्रित ठेवून ‘आयटेल व्हिजन वन’ हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे.

रचना

‘आयटेल व्हिजन वन’ हा सर्वसाधारण स्मार्टफोनसारखा आहे. कंपनीने या फोनच्या बाह्य़ रूपावर अनावश्यक निर्मिती खर्च न करता त्याच्या अंतर्भागावर मेहनत घेतल्याचे दिसून येते. ६.०८ इंच आकाराचा एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले असलेल्या या फोनला ‘वॉटरड्रॉप नॉच’ पुरवण्यात आला आहे. ‘नॉच डिस्प्ले’ ही संकल्पना आता रूढ झाली आहे. मोबाइलच्या दर्शनी भागातील कॅमेरा, स्पीकर यांच्यापुरती जागा मोकळी ठेवून फोनचा पुढील सर्व भाग डिस्प्लेने व्यापून टाकला जात असल्यामुळे वापरकर्त्यांना अधिक मोठी स्क्रीन मिळते. मात्र, ‘वॉटरड्रॉप नॉच’ असलेला ‘व्हिजन वन’ हा या किमतीतील पहिलाच फोन असल्याचा कंपनीचा दावा आहे.

कॅमेरा

या फोनमध्ये मागील बाजूस आठ मेगापिक्सेलचा कॅमेरा असून त्याला ०.०८ मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर असलेल्या कॅमेऱ्याची जोड देण्यात आली आहे. त्यासोबत एलईडी फ्लॅश मागील बाजूस असून या तिन्हींची रचना अगदी आयफोनमधील बॅक कॅमेऱ्यासारखी केली गेली आहे. छायाचित्रणाच्या बाबतीत हा कॅमेरा ठिकठाक काम करतो. आठ मेगापिक्सेल असल्याने

त्यातून येणारी छायाचित्रे अगदीच उत्तम दर्जाची आहेत, असे नाही. मात्र, या कॅमेऱ्यात आर्टिफिशियल इंटिलिजन्सची जोड देण्यात आली असल्याने छायाचित्रांचा दर्जा चांगला आहे. ‘व्हिजन वन’च्या पुढील बाजूस पाच मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला असून तो सेल्फीसाठी योग्य आहे.

सॉफ्टवेअर

‘आयटेल व्हिजन वन’ हा अँड्रॉइडच्या नवव्या आवृत्तीवर अर्थान ‘अँड्रॉइड पाय’ या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारा फोन असून त्याला ‘आयटेल’च्या ‘ओएस स्कीन’ची जोड देण्यात आली आहे. हा इंटरफेस अतिशय जलद आणि सरळ आहे. त्यातून जाहिरातींचा मारा होत नाही, हे विशेष. कारण कमी दरांतील स्मार्टफोनमध्ये स्वतंत्र इंटरफेस पुरवताना कंपन्या ‘प्रायोजक’ अ‍ॅप किंवा ब्राऊजरच्या माध्यमातून वापरकर्त्यांवर जाहिरातींचा मारा करतात व त्यामुळे इंटरनेटचा डेटा अकारण खर्च होतो. हे ‘आयटेल व्हिजन वन’मध्ये टाळण्यात आले आहे.

‘आयटेल व्हिजन वन’मध्ये युनिसॉकचा प्रोसेसर पुरवण्यात आला असून त्याला दोन जीबी रॅमची जोड देण्यात आली आहे. फोनमध्ये ३२ जीबीची अंतर्गत स्टोअरेज आहे. हा प्रोसेसर फारसा वेगवान नसल्याने तुम्हाला एकाच वेळी अनेक अ‍ॅप फोनवर सुरू ठेवणे जमणार नाही. अर्थात तीन किंवा चार अ‍ॅपची एका वेळी हाताळणी करता येते; परंतु व्हिडीओ पाहताना फोनचा वेग काहीसा मंदावतो.

बॅटरी

‘आयटेल व्हिजन वन’मध्ये चार हजार एमएएच क्षमतेची बॅटरी पुरवण्यात आली असून ही या फोनची उजवी बाजू आहे. या फोनच्या किंमतश्रेणीतील अन्य स्मार्टफोनच्या तुलनेत ही बॅटरी जास्त आहे आणि ती जास्त वेळ टिकतेही.

कमी किमतीत जास्त वैशिष्टय़ांचा आनंद

जास्त बॅटरी क्षमता, सुटसुटीत इंटरफेस, एचडी प्लस डिस्प्ले अशा वैशिष्टय़ांमुळे ‘आयटेल व्हिजन वन’ हा एक चांगला पर्याय ठरतो. पाच हजार रुपयांच्या किंमत श्रेणीतील स्मार्टफोनमध्ये वैशिष्टय़ांच्या बाबतीत तडजोड केल्याचे आढळते. कॅमेरा जास्त क्षमतेचा देण्यासाठी अन्य गोष्टी कमी दर्जाच्या वापरण्यात येतात. मात्र, आयटेल व्हिजन वनमध्ये अशी तडजोड करण्यात आलेली नाही. त्यामुळे कमी किमतीत सर्व वैशिष्टय़े अनुभवयाची असल्यास हा फोन एक चांगला पर्याय ठरू शकतो.

किंमत: ५४९९ रुपये