राजेंद्र श्रीकृष्ण भट

झाडे लावताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हाचा अंदाज. घरात गॅलरीत किंवा गच्चीत किती ऊन येते याची नोंद करावी. उत्तरायण आणि दक्षिणायनामुळे ऊन बदलत राहते. उन्हाच्या प्रमाणानुसार वेगवेगळी झाडे लावावीत.

झाडांच्या वाढीसाठी, फुले आणि फळे येण्यासाठी आवश्यक उन्हाचे प्रमाण वेगवेगळे असते. झाडांना पुनरुत्पादनासाठी विशिष्ट प्रमाणात ऊन लागते. अनेकदा झाड जगण्यासाठी पुरेसे ऊन येते, मात्र फुला-फळांसाठी ते अपुरे असते. उन्हात, परावर्तीत प्रकाशात आणि सावलीत वाढणाऱ्या वनस्पती वेगवेगळ्या असतात. साधारणपणे काटे असलेल्या वनस्पतींना जास्त ऊन आवश्यक असते. आपण रोपवाटिकेतून रोपे आणतो, तेव्हा त्यांच्यावर प्रवासाचा ताण आलेला असतो. मातीही थोडी हललेली असते. आणलेली झाडे लगेचच कुंडीत लावली तर ती मरण्याचा धोका असतो. आपण जसे बाहेरून आल्यावर थोडी विश्रांती घेतो, पाणी पितो, तशीच विश्रांती झाडांनाही आवश्यक असते. आणलेले रोप हवेशीर आणि फार ऊन येणार नाही, अशा जागी ठेवावे. थोडे पाणी घालावे आणि पानांवरही शिंपडावे. सात-आठ दिवसांत ती स्थिर होतात. त्यानंतर ती कुंडीत किंवा वाफ्यात लावावीत.

रोप लावण्यापूर्वी कुंडीला छिद्रे पाडून, तळाशी दगडगोटे घालून त्यावर रोपाच्या आकाराच्या अंदाजाने खत-माती घालून कुंडी तयार ठेवावी. आणलेली रोपे पिशवीत असतात. ही पिशवी तळहातावर घेऊन फक्त प्लास्टिक कापण्यासाठी आवश्यक तेवढाच दाब देऊन कापावी. पिशवी अलगद काढावी. मातीचा गोळा फुटणार नाही, याची काळजी घेऊन रोप हळूच कुंडीत ठेवावे.  गोळा फुटल्यास रोपाची केशमुळे तुटू शकतात आणि त्यामुळे रोप मरण्याची भीती असते. रोपाच्या आजुबाजूने रिकाम्या राहणाऱ्या जागेत मातीचे मिश्रण भरावे. रोप कुंडीत लावल्यावर त्याला हलके पाणी घालावे. कोणत्याही परिस्थितीत कुंडीत रासायनिक किंवा सेंद्रिय खत घालू नये. केवळ गांडूळ खत, शेणखत किंवा कंपोस्टच घालावे.