राजेंद्र श्रीकृष्ण भट

उन्हाळ्याच्या शेवटी, पावसाळ्याच्या तोंडावर अनेक प्रकारची कंदफुले उमलतात. अनेक पठारांवर, नद्यांच्या काठांवर अशी फुले फुलतात. यातील काही प्रकार प्रदेशनिष्ठ असतात. ती भौगोलिक परिस्थिती, उंची, हवामान, मातीचा प्रकार त्या वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असतात. आपण जर अशा पठारांवर फुले पाहण्यासाठी गेलात, तर कृपया हे कंद किंवा रोपे काढून आणू नका. कुंडीत किंवा बागेत ते उगवणार नाहीत आणि तिथली प्रजातीही संपून जाईल.

कुंडीत काही विशिष्ट कंदफुले लावता येतात. उन्हाळ्याच्या शेवटी किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला येणाऱ्या कंदफुलांची कळीच प्रथम जमिनीतून बाहेर पडते. हळूहळू कळीदांडे येऊन त्यावर फुले उमलतात. या फुलांवर या काळात असंख्य कीटक घोंघावत असतात. हे फुलणे काही दिवसांपुरतेच असले, तरी कंद लावण्याचा आनंद पुरेपूर मिळतो. या कंदांमध्ये भुईचाफा, मेफ्लॉवर (फायरबॉल) अप्रतिम असतात. हे महाराष्ट्रात सर्वत्र उगवतात. फुले फुलून गेल्यानंतर जोपर्यंत पाने पूर्णपणे सुकून खाली पडत नाहीत, तोपर्यंत पाणी द्यावे. पाने सुकल्यानंतर कंद खोदून काढून जपून ठेवावेत. असे केल्यामुळे एका कंदापासून अनेक कंद तयार करता येतात. पांढरा ते भडक लाल अशा विविध छटांची फुले येतात. छोटय़ा लीलीचा ताटवा छानच दिसतो. त्यात पांढरा, पिवळा, गुलाबी असे रंग असतात.

हिवाळ्यात सुंदर मोठी फुले येणारा, जगभर मोठय़ा प्रमाणात लागवड होणारा डेलिया फार आकर्षक दिसतो. जेवढे थंड हवामान तेवढी जास्त फुले येतात. उष्ण आणि दमट हवेत, वाढ चांगली होत नाही आणि फुलेही लहान येतात. डेलियाची फुले एवढी मोठी आणि वजनदार असतात की झाडाला दणकट आधार द्यावा लागतो.

फुले येऊन गेल्यावर रोपाला पाणी देणे बंद करावे. झाडे सुकून जातात. पूर्ण सुकल्यानंतर कंद खोदून बाहेर काढावेत. बुरशीनाशक द्रावणात बुडवून काढून सावली असलेल्या हवेशीर जागेत ठेवावेत. सुप्तावस्था संपल्यानंतर त्यांना मोड येतात. लागवड करण्यापूर्वी पुन्हा बुरशीनाशक द्रावणात बुडवून काढावेत.