घरात विविध आकारांच्या, रंगांच्या, नक्षीच्या बांगडय़ा असतात. काही वापरून कंटाळा आल्यामुळे पडून राहिलेल्या असतात, काही भेटवस्तू म्हणून मिळालेल्या, पण मापात न बसणाऱ्या म्हणून निरुपयोगी ठरतात, एखाद्या सेटमधील काही बांगडय़ा फुटल्यामुळे किंवा हरवल्यामुळे बाकीच्या बिनकामाच्या वर्गात गणल्या गेलेल्या असतात, तरीही त्यांचे रंग, कलाकुसर पाहून त्या टाकून देणे अवघड होऊन बसते. अडगळीत पडलेल्या अशा बांगडय़ांचा वापर भिंतीची शोभा वाढवणाऱ्या कलाकृतीप्रमाणे करता येईल. हीच कलाकृती विंड चाइमप्रमाणे खिडकीत टांगताही येईल.

  • साहित्य – ८-९ बांगडय़ा, चॉकलेटचे चकचकीत कागद, सोनेरी तारा, गम (फेविबाँड)

कृती  

  • बांगडय़ा हव्या त्या आकारात गमने (फेविबाँड) चिकटवून घ्या.
  • पूर्ण वाळू द्या. त्यासाठी साधारण २ ते ३ तास लागतात.
  • चॉकलेटचे चकचकीत कागद समान आकारात कापून घ्या.
  • कागदी पंखा बनवताना जशा घडय़ा घातल्या जातात त्याच पद्धतीने घडय़ा घाला.
  • बांगडय़ा जिथे परस्परांना जोडलेल्या असतात, तिथे सोनेरी तारेच्या साहाय्याने हे पंखे बांधा. त्यामुळे ते घट्ट बसतील.
  • पंख्यांच्या मध्यभागी तार बांधल्यामुळे पंख पसरवलेल्या पक्ष्यासारखा किंवा उडणाऱ्या फुलपाखरासारखा आकार येईल.
  • अवघ्या दोन तासांत कपाटातील अडगळ दूर होईल, ही पाखरे तुमच्या भिंतीची शोभा वाढवायला तयार होतील आणि सुंदर, आवडत्या बांगडय़ा कचऱ्यातही जाणार नाहीत.

अर्चना जोशी

apac64kala@gmail.com