News Flash

पॉवर ‘झूम’

‘कॅनन’चा ‘पॉवरशॉट एसएक्स७४० एचएस’ हा अतिशय आटोपशीर असा कॅमेरा आहे.

‘कॅनन’चा ‘पॉवरशॉट एसएक्स७४० एचएस’ हा अतिशय आटोपशीर असा कॅमेरा आहे. मात्र, लहान आकारामुळे त्याच्या कामगिरीवर कोणताही परिणाम झालेला नाही. साधारण २७ हजार रुपयांच्या किंमत श्रेणीत उपलब्ध असलेल्या या कॅमेऱ्याचे सर्वात मोठे वैशिष्टय़ हे त्यातील ‘४०एक्स’ झूम सुविधा आहे.

स्मार्टफोनने डिजिटल कॅमेऱ्यांची सद्दी संपवली, ही अतिशयोक्ती नाही. छायाचित्रणासाठी किंवा चित्रीकरणासाठी आवश्यक असलेली दर्जेदार वैशिष्टय़े असलेले कॅमेरे स्मार्टफोनमध्येच उपलब्ध होऊ लागले आहेत. अगदी ‘फोर के’ रेकॉर्डिगची सुविधाही स्मार्टफोनमधून मिळू लागली आहे. साहजिकच दोन गॅझेटचे काम एकच गॅझेट करू लागल्यावर वापरकर्त्यांचा ओढा ‘बहुकार्यक्षम’ स्मार्टफोनकडे वाढू लागला. असे असले तरी, डिजिटल कॅमेरे बाजारातून हद्दपार झालेले नाहीत. उलट नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेत तेही आता ‘स्मार्ट’ होऊ लागले आहेत. कमी आकाराचे पण मोठय़ा कॅमेऱ्यांच्या तोडीची कामगिरी करणारे डिजिटल कॅमेरे हौशी छायाचित्रकारांना आजही हवेहवेसे वाटतात. हीच बाब कॅननच्या ‘पॉवरशॉट एसएक्स७४० एचएस’बाबत म्हणता येईल. या कॅमेऱ्याचा आकार कमी असला तरी, कामगिरीच्या बाबतीत तो कोठेही कमी पडत नाही.

डिझाइन आणि वैशिष्टय़े

‘एसएक्स७४०’ हा कॅननच्या आधीच्या डिजिटल कॅमेऱ्यांपेक्षा दिसायला फारसा वेगळा नाही. याचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे त्यात ४० पट ‘ऑप्टिकल झूम’ची सुविधा आहे. त्यामुळे बाह्य़ लेन्सची जोड न देताही तुम्ही अतिशय दूरचे छायाचित्रणही व्यवस्थित करू शकता. या कॅमेऱ्यात २०.३ मेगापिक्सेल क्षमतेचा कॅमेरा पुरवण्यात आला आहे. मात्र, कॅमेऱ्याचा आकार लहान ठेवण्याच्या प्रयत्नात त्यातील सेन्सरशी काहीशी तडजोड करावी लागली आहे. या श्रेणीतील अन्य कॅमेऱ्यांच्या तुलनेत यातील सेन्सर लहान (१/२.३ इंच) आहे. यामुळे अंधूक प्रकाशात या कॅमेऱ्याने केलेले चित्रीकरण फारसे उठावदार होत नाही. मात्र, याचा परिणाम आउटडोअर छायाचित्रण किंवा उजेडातील छायाचित्रणावर अजिबात होत नाही.

या कॅमेऱ्याच्या वरच्या बाजूला ‘शूटिंग मोड’साठीची चकती देण्यात आली आहे. या चकतीमध्ये नेहमीच्या पर्यायांसोबत फूड आणि सेल्फी हे मोडही देण्यात आले आहेत. सेल्फीला सध्याच्या घडीला प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे ‘एसएक्स७४०’मध्ये कॅननने याकडे पुरेपूर लक्ष दिलेले आहे. या कॅमेऱ्यामध्ये ७.५ सेंमीचा एलसीडी डिस्प्ले पुरवण्यात आला असून हा डिस्प्ले  १८० अंशात वरच्या बाजूला वळवता येतो. त्यामुळे या कॅमेऱ्यातून सेल्फी टिपताना चेहरे व्यवस्थितपणे पाहता येतात.

सेल्फीप्रमाणेच या कॅमेऱ्यात ‘फूड मोड’देखील पुरवण्यात आला आहे. सध्या सेल्फीप्रमाणेच ‘फूड फोटोग्राफी’देखील लोकप्रिय आहे. खाद्यपदार्थाची छायाचित्रे टिपून ती शेअर करण्यावर अनेकांचा भर असतो. या पाश्र्वभूमीवर कॅननने ‘एसएक्स७४०’मध्ये ‘फूड मोड’ पुरवून वापरकर्त्यांना नवीन पर्याय पुरवला आहे.

या कॅमेऱ्याच्या मागील बाजूस विविध कंट्रोल बटणे असून ही सर्व कॅमेऱ्याच्या उजव्या बाजूस आहेत. त्यामुळे एका हाताने छायाचित्रण करताना वापरकर्त्यांला कोणतीही अडचण येत नाही. विशेष म्हणजे, या बटणांमध्ये एक आगळेवेगळे बटण आहे. तुम्ही छायाचित्र टिपत असताना तुमचा ‘फोकस’ असलेली वस्तू व जीव हलला वा छायाचित्राच्या फ्रेममधून नाहीसा झाला तर, हे बटण दाबून तुम्ही त्या गोष्टीवर आपोआप ‘फोकस’ करू शकता.

छायाचित्रांचा दर्जा

‘एसएक्स७४०’ हा उजेडात किंवा बाहेरील वातावरणात छायाचित्रणासाठी उत्कृष्ट कॅमेरा आहे. या कॅमेऱ्यातील ४० पट झूम सुविधेमुळे छायाचित्रे अतिशय सुस्पष्ट येतात. त्यामुळे निसर्गचित्रण किंवा उंच झाडावर बसलेला पक्षी ‘टिपण्यात’ हा कॅमेरा जबरदस्त कामगिरी करतो. मात्र, यातील लहान आकाराच्या सेन्सरमुळे अंधूक प्रकाशात या कॅमेऱ्यातून केलेले छायाचित्रण फारसे उठावदार येत नाही. ही छायाचित्रे काहीशी धूसर दिसतात. या कॅमेऱ्यात रंग अतिशय अचूकपणे निवडले जातात. मात्र, त्यासाठीही पुरेसा प्रकाश असणे आवश्यक आहे. कृत्रिम प्रकाशात छायाचित्रातील पांढरा रंग काहीसा पिवळट येतो. मात्र, तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन त्यात बदल करू शकता. या कॅमेऱ्यामध्ये ४के चित्रीकरणाची सुविधा आहे. घरगुती कार्यक्रमांतील छायाचित्रणासाठी ही सुविधा अतिशय उपयुक्त आहे. मात्र, अलीकडे नवनवीन स्मार्टफोनमध्येही ‘फोर के’ रेकॉर्डिगची सुविधा पुरवण्यात येते. त्यापेक्षा वेगळे सांगण्यासारखे असे ‘एसएक्स ७४०’मध्ये नाही.

स्क्रीन

मगाशी सांगितल्याप्रमाणे या कॅमेऱ्यातील डिस्प्ले स्क्रीन १८० अंशात वळवता येते. त्यामुळे केवळ सेल्फीच नव्हे तर, वेडय़ावाकडय़ा स्थितीतही छायाचित्रण करण्यासाठी हा डिस्प्ले उपयुक्त ठरतो. मात्र, या स्क्रीनला ‘टच’ने हाताळण्याची सुविधा नाही. अलीकडच्या काळात जवळपास प्रत्येक गॅझेट स्पर्शाने हाताळता येते. अशा स्थितीत ‘एसएक्स७४०’ची स्क्रीनही स्पर्श संवेदनशील बनवण्याकडे कॅननने लक्ष पुरवणे आवश्यक होते. तसेच छायाचित्रे टिपल्यानंतर ती पाहण्यासाठी बटणे हाताळण्यापेक्षा स्क्रीनवर स्पर्श करून ती पाहणे उपयुक्त ठरते. याबाबतीत ‘एसएक्स७४०’ वापरकर्त्यांची काहीशी निराशा करतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 3:09 am

Web Title: canon powershot sx740 hs review
Next Stories
1 ताणमुक्तीची तान : आजूबाजूच्या चांगल्या गोष्टी पाहा
2 न्यारी न्याहारी : चीज-पालक-बटाटा सँडविच
3 बचतीची दिवाळी
Just Now!
X