कॉलेज आठवणींचा

कोलाज

सावनी रवींद्र, गायिका

नारळीपौर्णिमेचा दिवस हा संस्कृत दिन म्हणून ओळखला जातो. मी आठवीला असताना डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी व फग्र्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्यासमोर एक गाणं सादर केलं होतं. माझ्या सुरेल आवाजाची मोहिनी प्राचार्यावर पडली व त्यांनी फग्र्युसनलाच प्रवेश घेण्याचा आग्रह धरला. मलाही दहावीत ८० टक्के होते. त्यामुळे मला तिथे सहज प्रवेश मिळाला. आठवीपासूनच फग्र्युसन महाविद्यालय, कला शाखा व संस्कृत स्पेशल विषय हे माझं ठरलेलं होतं. त्यामुळे माझा फोकस हा स्पष्ट होता.

अकरावी ते एम.ए अशी सात वर्षे मी फग्र्युसनच्या एका भव्यदिव्य वास्तूत वाढले. मी चिंचवडला राहायचे. त्यामुळे अकरावी-बारावी ही दोन वर्षे मला प्रवास झेपवून घेण्यात गेली. मराठी माध्यमातून शिकल्याने फग्र्युसनच्या वातावरणात रुळायला मला जरा वेळ गेला. पदवी शिक्षणाच्या पहिल्या वर्षांला असल्यापासून मी नाटय़विभागाकडे वळले. धर्मकीर्ती सुमंत, सुयश टिळक, पर्ण पेठे हे माझे मित्र. यांच्यासोबत मी एकांकिका केल्या. रंगभूमी गाजवली. स्पर्धा  जवळ आली की आम्ही कॉलेजमध्ये राहायचो. आमच्या तालमी रात्री उशिरा संपायच्या. मी तशी भित्री! माझ्या भित्रेपणाचा माझ्या सर्व मित्रांनी एकदा चांगलाच फायदा करवून घेतला. त्याचं झालं असं, मला मित्रांनी पटवून दिलं  की, रात्री बारा वाजता फग्र्युसनच्या बाहेर फग्र्युसनची म्हणजे ज्यांनी हे कॉलेज सुरू केलं त्यांची छबी दिसते. आणि मीही वेडय़ासारखी हो का? अरे बापरे! सांभाळलं पाहिजे वगैरे प्रतिसाद दिला. एकदा रात्री बारा वाजता मला फसवून माझ्या मित्रांनी बाहेर नेलं व घाबरवलं. काळोख्या अंधारात माणसासारखी दिसणारी आकृती पाहून फग्र्युसनच्या भल्यामोठय़ा वास्तूत मी कर्णकर्कश आवाजात किंचाळले. ज्याने र्अध फग्र्युसन जागं झालं व काय झालं, हे बघायला माझ्यापाशी आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी लख्ख सूर्यप्रकाशात पाहिलं तर समोरच्या इमारतीच्या गच्चीवर सजावट केली होती आणि ती सजावट रात्री अंधारात मानवी आकृतीसारखी भासत होती. हे व असे अनेक किस्से तालमीच्या दरम्यानचे आहेत.

माझा अभ्यासाचा चमू वेगळा होता. मी रोज लेक्चर अटेंड करायचे. कॉलेज संपलं की टवाळक्या करणारा चमू वेगळा होता. कॉलेजमध्ये असताना प्रचंड खवय्येगिरी केली आहे. रुपाली, वैशाली आणि वाडेश्वर हे आमचे अड्डे होते. वैशालीला तर आठवडय़ातून एकदा

आमचा संस्कृतचा तास तिकडे भरायचा. माझे संस्कृतचे सर प्रसाद जोशी हे अत्यंत कूल होते.

सकाळी ७ वाजता मोठय़ा टेबलवर वैशालीतली गरमागरम कॉफी, स्वादिष्ट इडली आणि तजेलदार संस्कृत असं समीकरण दर शनिवारी असायचं. आजही मी वैशालीत गेले की त्या जागेकडे बघून नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. लहानपणापासूनच मी गात होते. पंडित हृदयनाथजी, सुरेश वाडकर अशा अनेक दिग्गजांच्या सहवासात मी वावरत होते. रात्री उशिरा रेकॉर्डिंग संपवून मी सकाळी ८ वाजता पेपरसुद्धा दिलाय. भावगीतांवर माझं विशेष प्रेम होतं. कॉलेजमध्ये अकरावीला असताना ऊर्जा फेस्टिव्हलच्या सोलो सिंगिंग स्पर्धेमध्ये मित्रांच्या आग्रहास्तव मी सहभागी झाले. पहिल्या राऊंडसाठी मी माझं आवडतं गाणं ‘विसरलाशील खास मला’ हे गाणं गायले. तिकडे परीक्षक म्हणून विराजमान असलेले त्याच कॉलेजचे सीनियर होते. जे गिटार आणि पाश्चात्त्य संगीतप्रेमी होते. अर्थातच त्यांनी मला रिजेक्ट केलं. त्या रिजेक्शनचा मला इतका धक्का बसला की, त्यानंतर मी कोणत्याच स्पर्धेत सहभागी झाले नाही. थेट झाले ते सा रे ग म प मध्ये.

कॉलेजमध्ये असताना संस्कृत दिवस आम्ही जोशात साजरे केले आहेत. आम्ही हिंदी, मराठी गाणी संस्कृत भाषांतरित करून गायचो. संस्कृत नाटक सादर करायचो. मराठी नाटकासाठी प्रेक्षक खिळवणं तसं सोप्प आहे. पण सतत कानावर न पडणाऱ्या संस्कृत भाषेतून नाटक सादर करून प्रेक्षकांचं मनोरंजन करणं तसं कठीण. पण आम्ही हे आव्हान स्वीकारायचो व लीलया पेलायचो.|| शब्दांकन : मितेश जोशी