आम्ही बदललो : प्रा. रसिका सावंत

बदल हा मानवाचा मूळ स्वभाव आहे. कालपेक्षा आज आणि आजपेक्षा उद्याची परिस्थिती नेहमी बदलत जाणारी असते. त्यानुसार प्रत्येकामध्ये बदल होणे स्वाभाविक आहे. काही बदल आपण जाणीवपूर्वक करतो तर काही बदलांना आजूबाजूची परिस्थिती, दिवसागणिक येणारे अनुभव कारणीभूत ठरतात.

मी साठय़े महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका आहे. शिक्षिकेच्या भूमिकेमुळेच बदलाची खऱ्या या अर्थाने सुरुवात झाली असं मला नक्कीच म्हणता येईल. विद्यार्थिदशेत दुनिया वेगळी असते याचा अनुभव प्रत्येकजण घेत असतो. पण ‘टीचर भी कभी स्टुडंट थी’ म्हणून शिक्षकांना वावरता येत नाही. शिक्षक झाल्यावर कळलं की, विद्यार्थिदशेत ‘चलता है’ म्हणून बऱ्याच गोष्टी सोडून दिल्या, तर काही छोटय़ा छोटय़ा गोष्टींशी मला घेणं-देणंसुद्धा नव्हतं. आता माझ्या विद्यार्थ्यांसोबत राहून काही गोष्टी जाणवतात आणि स्वत:मध्ये बदल करायला त्या कारणीभूत ठरतात. होय..विद्यार्थीसुद्धा खूप काही शिकवून जातात.

डोक्यात प्रकाश पडला : एका ग्रामीण भागात लेक्चर्ससाठी गेले होते. एप्रिल-मे दरम्यान परीक्षा असल्याने उजळणी लेक्चर्स खूप वेळ चालणार होते. शिकवता- शिकवता अचानक वीज गेली. साधारण १० मिनिटे, फार फार तर १५- २० मिनिटांनी पुन्हा येईल या अपेक्षेने शिकवण्याचा ओघ तसाच राहिला. बोलता बोलता घामाच्या धारा फुटू लागल्या. दमसुद्धा लागला. लाइट गेले, मला घाम आणि दम लागला; पण विद्यार्थी मात्र शांत होते, लाइट गेल्याने त्यांना काहीही फरक पडत नव्हता. शेवटी मीच न राहवून विचारलं, कधी येईल वीज? समोरून उत्तर आलं, ‘माहीत नाही’. माझ्या इतकाच त्यांना देखील हा उकाडा हैराण करत असणार. त्यात ‘माहीत नाही’ हे उत्तर आणि तरीही ही मुलं शांत कशी, असा विचार मनात आल्याशिवाय राहिला नाही. पुढे पाच एक मिनिटांचा ब्रेक घेतला. अर्थात मला तो घ्यावा लागला. विजेशिवाय जगणं हे त्यांच्या आयुष्यात किती सहज आहे आणि आपण इथे कोणताही विचार न करता वीज वापरतो. या घटनेनंतर नंतर घरात, वर्गात, कुठेही विनाकारण लाइट, पंखे चालू दिसले तर मी स्वत: जाऊन ते बंद करते.

मृत्यूपलीकडचे दु:ख : ‘अगं उपन्नाचा दाखला काढून घे ना’, तो नसेल तर तुला फीसाठी सवलत मिळू शकणार नाही, असं मी माझ्या विद्यार्थिनीला सांगत होते. माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच तिने सांगितलं, ‘’आईबाबा दोघेही अपघातात वारले. घरी आजी (आईची आई) असते. वडिलांकडच्या सगळ्या नातेवाईकांनी काहीही संबंध ठेवला नाहीये’’. हे बोलून ती शांत झाली आणि मीही. सध्या तरी तिला फीमध्ये सवलत मिळावी हे महत्त्वाचे होते. अशा परिस्थितीत काय करता येईल हे विचारायला तिला कॉलेजच्या ऑफिसमध्ये पाठवले. पुढच्या १० मिनिटात ती रडत आली. समोर मी आणि आमचे सर बसलो होतो. डोळे पुसत, स्वत:ला सावरत ती बोलू लागली. सॉरी सर, सॉरी मॅम, मी खोटं बोलले. ऑफिसमध्ये माझ्याकडे आईवडिलांचे डेथ सर्टिफिकेट (मृत्यूचे प्रमाणपत्र) मागितले. ते मी नाही देऊ  शकत. माझे आईवडील वारलेले नाहीत. ‘ते वारलेले आहेत’, हे मी सगळ्यांना खोटं सांगते, तसं तुम्हालाही सांगितलं. माझ्या आईच्या मृत्यूला वडील कारणीभूत आहेत आणि त्यामुळे ते जेलमध्ये आहेत. त्यामागची सविस्तर  घटना ती सांगत होती आणि आम्ही दोघेही सुन्न झालो. अवघ्या १० मिनिटांच्या आत ‘आईवडील वारले…वडील जेलमध्ये आहेत’ हे पचवणं फार अवघड होतं.

या आणि अशा अनेक घटना समोर येत गेल्या आणि कळले की, आपण आपल्या विश्वात रमलेले असतो. आपल्या समस्या आपल्याला खूप मोठय़ा वाटतात; पण तसं नसतं. तेव्हापासून मी माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक समस्येकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला शिकले.