संतोष बडे

ऑस्ट्रेलियात भटकंतीची अनेक ठिकाणे आहेत. सिडनी शहरातला हार्बर ब्रीज, ऑपेरा हाऊस, मेलबर्नचे स्टेडियम हे आकर्षणाचे मुद्दे आहेतच, पण ही तर नेहमीची पर्यटनस्थळे आहेत. त्याशिवाय एक भन्नाट आकर्षण इथे आहे. ते म्हणजे ग्रेट ओशन रोड. या रस्त्यावर स्वत: गाडी चालवण्याची संधी चुकवू नका. तुम्हाला गाडी चालवण्याची आवड असेल तर नक्कीच हा प्रवास कायम स्मरणात राहील.

ग्रेट ओशन रोडची सुरुवात तोरके या गावापासून होते आणि वर्नामबूल नावाच्या गावात तो संपतो. मेलबर्नपासून साधारण ८०-९० किलोमीटरवर तोरके नावाच्या गावापासून हा ग्रेट ओशन रोड सुरू होतो. तोरके गावाला अत्यंत सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. तिथे सर्फिगसाठी संपूर्ण ऑस्ट्रेलियामधून सर्फिगप्रेमी लोक येत असतात. या ठिकाणाला ऑस्ट्रेलियाची सर्फिग कॅपिटल असे देखील म्हटले जाते.

ग्रेट ओशन रोडचे बांधकाम झाले ते पहिल्या महायुद्धानंतर. महायुद्धानंतर परत आलेल्या सैनिकांना काम द्यावे व एक युद्ध स्मारक बांधावे या उद्देशाने सरकारने परत आलेल्या सर्व सैनिकांच्या माध्यमातून या रस्त्याचे बांधकाम केले. आजही या रस्त्यावर ही लष्करी थाटाची छाप आढळते. सर्व साईन बोर्ड अतिशय शिस्तीत असून रस्ता तांत्रिकदृष्टय़ा उत्तम आहे. त्यामुळे संपूर्ण प्रवासात शीण जाणवत नाही. जोडीला असणाऱ्या समुद्रकिनाऱ्यामुळे प्रवास रमणीय होतो. डाव्या हाताला समुद्र आणि उजवीकडे सुंदर जंगल आहे. मधून २४३ किलोमीटरचा सुंदर वळणदार डांबरी रस्ता जातो. अशा परिसरामुळे प्रवास कधी संपला आणि नागरी वस्तीत आपण कधी पोहोचलो, हे कळतही नाही.

ग्रेट ओशन रोड १९३२ साली बांधून पूर्ण झाला. जगातील सर्वात निसर्गसुंदर किनारी मार्ग म्हणून याचा उल्लेख केला जातो. आता या रस्त्यावर अनेक गावे वसली आहेत. अपोलो बे, योवांना, लोर्ने, पोट कॅम्पबेल अशी अनेक गावे इथे असून या ठिकाणी राहण्याची व खाण्याची उत्तम सोय होऊ  शकते. मात्र या रस्त्याचा काही भाग अतिशय निर्मनुष्य असून मोबाइल नेटवर्कसुद्धा काही वेळा लुप्त होते.

या रस्त्यावरून वाहन चालवताना एक लक्षात ठेवणे फार आवश्यक आहे की, हा रस्ता दुपदरी असून मध्ये दुभाजक नाही. सर्व गाडय़ा (म्हणजे बससुद्धा) एक निश्चित वेगमर्यादा पाळूनच ये-जा करताना दिसतात. आपल्यालाही या वेगमर्यादेचे पालन करावे लागते. ताशी ५० ते १०० किमी या दरम्यानची मर्यादा, विविध ठिकाणी नमूद केलेली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी लुक आऊट म्हणजे निसर्गदृश्य पाहण्यासाठी विशेष जागा तयार केलेल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीत अडथळा न आणता पर्यटकांना निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येतो.

पोर्ट कॅम्पबेल येथे आपण पोहचतो तेव्हा एक अद्भुत नैसर्गिक आश्चर्य पाहायला मिळते. ते म्हणजे ट्वेल्व्ह अपोस्टल, म्हणजेच स्टॅलगमाइट रॉक कॉलम. साधारण २०० फूट उंचीचे चुनखडीचे स्वतंत्र उभे असलेले लांबरुंद असे स्तंभ येथील समुद्रात दिसतात. येथील समुद्रकिनारी लाइम स्टोनच्या छोटय़ा छोटय़ा टेकडय़ा आहेत. समुद्राच्या लाटांमुळे धूप होऊन त्यातून हे असे स्तंभ किंवा ठोकळे तयार झाले आहे. त्याभोवती एक दंतकथादेखील गुंफण्यात आली आहेत. सध्या यापैकी आठ स्तंभ शिल्लक आहेत. या स्तंभांशिवाय या लाइम स्टोनच्या टेकडय़ांमध्येदेखील धूप झाल्यामुळे अनेक आकार तयार झाले आहेत.

या ठिकाणी सकाळी आणि सायंकाळी प्रकाशाचा खूप सुंदर खेळ अनुभवता येतो. सकाळी सूर्याची किरणे रस्त्यापलीकडच्या डोंगरातून स्तंभांना उजळवून टाकतात, तर सूर्यास्ताच्या वेळी आकाशातील विविधरंगी उधळण आणि सोनेरी भासणारे स्तंभ अवर्णनीय असतात. हे अनुभवायचे असेल तर वाटेवरील पोर्ट कॅम्पबेल या गावी राहावे लागेल. अर्थातच हा मुक्काम सार्थकी लागते हे नक्की.

मेलबर्नहून या रस्त्याची सफर घडवून आणणाऱ्या अनेक टुरिस्ट कंपन्या मोठय़ा बसमध्ये सर्वाना घेऊन एका दिवसात ग्रेट ओशन रोडची टूर अक्षरक्ष: उरकतात. खरंतर या ग्रेट ओशन रोड टूरसाठी किमान दोन दिवस हवेत. आणि एकदमच आराम करायचा असेल, समुद्रकिनारी चालत भटकायचे असेल, तर आणखीन एक-दोन दिवस घ्यायला देखील हरकत नाही. पहिला मुक्काम अँगलसी या गावी, दुसरा अपोलो बे या गावी, तर तिसरा मुक्काम पोर्ट कॅम्पबेलमध्ये करावा. परतीचा प्रवास कोलॅकमार्गे मेलबर्न (अंदाजे ३ तास प्रवास) असा करावा. अर्थात याच रस्त्याने पुढे अ‍ॅडलेड गावीसुद्धा जाता येते. त्यासाठी अंदाजे ७ तास प्रवास करावा लागतो. ग्रेट ओशन रोडवरील भ्रमंती नक्कीच संस्मरणीय ठरेल.

चॉकलेट फॅक्टरी

ग्रेट ओशन रोडच्या सुरुवातीलाच एक गोड आकर्षण आहे. ते म्हणजे तिथे असलेला चॉकलेट कारखाना. तिथे प्रकारच्या चॉकलेट आणि आईसक्रीमची चव मोफत घेता येते. तसेच तेथील कॅफेटेरियात भरपेट नाश्ता केल्यास वाहन चालवताना नक्कीच जोर येईल.